केज दि.४ – पूर्वी दळणवळणाची साधने अत्यंत कमी होती. खाजगी वाहने तर कुठेतरी पाहायला मिळायची आणि चुकून एखादी एसटी महामंडळाची बस आपल्या गावामध्ये जर आली तर तो कुतूहलाचा विषय ठरत असे. मात्र कालांतराने दळणवळणाची साधने वाढली आणि महामंडळाची बस सर्वसामान्यांची जीवनवाहिनी झाली. मोठ्या प्रमाणावर लोक एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात आणि आता बस पाहणे ही गोष्ट काही नवीन राहिलेली नाही. परंतु एखाद्या गावामध्ये एकाच वेळेस अनेक बसेस जर पाहायला मिळाल्या तर मात्र कुतूहलाचा विषय ठरतो. आणि असाच प्रकार आज केज शहरामध्ये पाहायला मिळाला.
केज शहरातील पंचायत समितीच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर बसेस अगदी दुपारपासूनच एकत्र होऊ लागल्या. नेमक्या या बसेस पंचायत समितीच्या मैदानावर का जमा होऊ लागलेल्या आहेत याचे सुरुवातीला पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटले. मात्र काही वेळाने बसेस का येत आहेत याचा उलगडा झाला. मंगळवारी दिनांक ५ डिसेंबर रोजी परळी येथे ”शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी केज तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांना घेऊन जाण्यासाठी या बसेसची सोय करण्यात आलेली आहे. याबाबत केज पंचायत समितीचे बिडीओ राजेंद्र मोराळे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी पंचायत समितीसाठी 31 बसेस दिल्याचे सांगितले. मात्र एकूण बसेस केज तालुक्यासाठी किती आहेत याची विचारणा करण्यासाठी तहसीलदार अभिजीत जगताप यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क न झाल्याने नेमका आकडा कळू शकलेला नाही.मात्र पंचायत समितीचे मैदान बसेसने अगदी गच्च भरले आहे.
मात्र एकाच वेळेस केज शहरामध्ये एवढ्या बसेस पाहण्याची बहुतेक शहरवासीयांची पहिलीच वेळ असावी.