Site icon सक्रिय न्यूज

मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही – मनोज जरांगे…! 

केज दि.१२ –  मराठा समाजाला मी माय-बाप मानतोय, मी मरण पत्करेल परंतू गद्दारी करणार नाही. आरक्षणाची लढाई जिंकून अनेक वर्षांपासून आरक्षणाची आस लावून बसलेल्या गोर-गरीब मराठ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्याचा क्षण मला डोळ्यांनी पहायचा असल्याचे मनोज जरांगे यांनी मंगळवार (दि.१२) रोजी बोरीसावरगाव येथील विराट सभेत सकल मराठा समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले.
             तालुक्यातील बोरीसावरगाव येथील सभा मंगळवारी नियोजित वेळेपेक्षा अडीच तासाने साडेबारा वाजता उशीरा सुरू झाली. सभास्थळी आगमन होताच पंचावन्न जीसीबी साहाय्याने पुष्पवृष्टी करून मनोज जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी माझी तब्येत बिघडल्याने काल मला काही समजत नव्हते आणि दिसत नव्हते. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र मी दिलेला शब्द पाळणारा असल्याने थोडा उशीर झाला आहे. आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात असून एक्कोण चाळीस लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे ऐंशी टक्के लढाई जिंकल्यात जमा आहे. म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात संविधानिक पदावर असलेले छगन भुजबळ हे आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येत असल्याचे पाहून उगाच आग पाखड करून समाजा-समाजात भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. ते मी ओबीसी बांधवांचा शत्रू असल्याचे चित्र उभा करत आहे. मात्र गावपातळीवरील आम्ही एकमेकांच्या सुख-दु:खाला धाऊन जातोत. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही चिंता करू नका, फक्त आरक्षण मिळू द्या, त्याच्यात किती दम आहे ते मी एकटाच पाहतो. सरकारला चोवीस डिसेंबर ची वेळ दिली आहे. एकट्या छगन भुजबळांचे ऐकून सरकारने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला विलंब लावू नये, अन्यथा यापुढील आंदोलन परवडणारे नसल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांना दिला. मराठा समाजाला सत्तर वर्षे आरक्षणाची वाट पहावी लागली आहे. गरीब मराठ्यांना सत्तर वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर जगात प्रगत जात म्हणून मराठा समाज ओळखला गेला असता. यापुढे मराठा समाजाने गावागावात जाऊन मराठा समाजाची एकजूट कण्याचे व व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. या आरक्षणाच्या लढ्यात मी एक इंचही मागे हटणार नाही, मला तुमच्या आशिर्वादाची आवश्यकता असून ही मराठ्यांची एकजूट अशीच कायम राहू द्या. विजय आपलाच असल्याचा विश्वास उपस्थितांना दिला. आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी सतरा डिसेंबर रोजी अंतरवली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला राज्यातील समन्वक व आयोजकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
                    दरम्यान, आतापर्यंत शांततेच्या आंदोलनातूनच मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणले आहे. यामुळे आरक्षणाचा लढा फक्त शांततेत करायचा आहे. आरक्षण मिळेपर्यंत संयम ठेवा. मी सांगतो म्हणून सहन करा. सत्तर वर्षानंतर मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळत आहे. या संधीचे सोने मराठ्यांनी करावे. कोणी किती डाव रचले तरी ते यशस्वी होऊ देऊ नका. एकजूट अशीच कायम ठेवा. आपल्याला आरक्षणाची लढाई शांतेतत करून जिंकायचीही आहे. माझा जीव गेला तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी येथे मंगळवारी बोरीसावरगाव येथील विराट सभेत बोलताना व्यक्त केला.
शेअर करा
Exit mobile version