Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात पुढील 12 दिवस शीघ्र कृती दल तैनात राहणार….!

बीड जिल्ह्यात पुढील 12 दिवस शीघ्र कृती दल तैनात राहणार….!
बीड दि. १७ (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस दल अधिकच सतर्क झाले आहे. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण आणि मनोज जरांगे यांची मुंबई यात्रा या पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यात पुढील १२ दिवस शीघ्र कृती दल तैनात राहणार आहे. विशेष म्हणजे या शीघ्र कृतिदलाला आदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त केले असून ते शीघ्र कृती दलासोबतच राहणार आहेत.
            बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मोठ्याप्रमाणावर हिंसाचार झाला होता. यात अनेकांची घरे आणि दुकाने जाळण्यात आली होती. त्याचे पडसाद राजभरात उमटले होते. पोलिसांनी या प्रकरणा ३०० च्या आसपास व्यक्तींविरोधात गुन्हे देखील दाखल केले. या हिंसाचारावेळी पोलिसांनी कसलीही कृती केली नाही असा देखील आरोप सर्रास करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता बीड जिल्हा पोलीस अधिक सतर्क झाले
आहेत. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम आणि मनोज जरांगे यांची मुंबई यात्रा यामुळे आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
                      मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बीड जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळत आलेला आहे. त्यामुळेच आता मधील १२ दिवस बीड जिल्ह्यात शीघ्र कृती दल तैनात राहणार आहे. ३० तारखेपर्यंत जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी शीघ्र कृती दलाची नजर असेल. त्यासाठी शीघ्र कृती दलाच्या तुकड्या बीड जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. तणावाची परिस्थिती उद्भवल्यास शीघ्र कृती दलाला आदेश देण्यासाठी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी असे कार्यकारी दंडाधिकारी नेमावेत असा प्रस्ताव बीडचे प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिला होता.
          दरम्यान, जिल्हा दंडाधिकाऱ्यानी बीड जिल्ह्यातील तीन नायब तहसीलदारांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना शीघ्र कृती दलासोबत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तब्बल १२ दिवस शीघ्र कृती दल तैनात राहण्याची मागच्या काही वर्षातील जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असेल.
शेअर करा
Exit mobile version