केज दि.२८ – दारूची मुक्तपणे वाहतुक करू देण्यासाठी युसुफवडगाव (ता. केज ) पोलीस ठाण्याचे हवालदार रावसाहेब गणपत मुंडे यास ठाण्याच्या हद्दीत मासिक हप्ता म्हणून 5 हजार रूपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शनिवारी (दि. 27 ) दुपारी रंगेहाथ पकडले.
तालुक्यातील तक्रारदार हा सध्या देशी दारूचे बॉक्स युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत खेडेगावात वाहतूक करतो. त्यावर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून 5 हजार रूपये लाचेची मागणी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे हवालदार रावसाहेब गणपत मुंडे याने 27 जानेवारी रोजी मागणी केली होती. त्या दोघांमध्ये तडजोड होऊन तेवढी रक्कम देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अगोदर संबंधित पोलीस हवालदाराने लाच मागणी केल्याची पंचासमक्ष खातरजमा करून संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा लावला. 27 जानेवारी रोजी दपारी युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ तक्रारदाराकडून 5 हजार रूपयांची लाच स्वीकारताना हवालदार मुंडे यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, सहाय्यक फौजदार विठ्ठल राख जमादार नागरगोजे, जमादार सुनील पाटील, चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने केली.
दरम्यान , मागच्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कुठे ना कुठे लाचखोर मासे गळाला लागत असल्याने जिल्ह्याला भ्रष्टाचाराने जिल्ह्याला किती पोखरले आहे हे यावरून दिसून येते.