केज दि.३ – शहरातील खामगाव-पंढरपूर व अहमदपूर- अहमदनगर या महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नियंत्रणाखाली काम करत असलेल्या एचपीएम व मेगा कंपनीसह इतर कांही कंपन्यांनी अत्यावश्यक कामे अद्याप पूर्ण केलेले नाहीत यासाठी येत्या सोमवार व मंगळवार रोजी या कंपन्या व महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या विरोधात केज विकास संघर्ष समितीने तीव्र आंदोलन छेडन्याचा निर्धार केला आहे.
केज शहरात अहमदपूर – अहमदनगर या महामार्गावर एमएमआरडीसी अंतर्गत एचपीएम कंपनी काम करत आहे. गेली चार वर्षांपासून केज शहर अंतर्गत भागात कंपनी काम करत आहे मात्र अद्याप विहित मुदतीत कंपनीने आपली कामे पूर्ण केलेली नाहीत. या कंपनीने महामार्गावरील पथदिवे सुरू केलेले नाहीत तसेच केजडी नदीवरील पूलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू ठेवले आहे , पुलाच्या जवळचा अर्धवट रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ कांही अपूर्ण रस्ता आणि केज परिसरात केजचे उपजिल्हा रुग्णालय जवळचा पूल, कदमवाडी पाटीजवळचा पूल, सांगवी पाटीजवळचा पूल इत्यादी भागात निर्माण झालेले कटाव दुरुस्त करणे गरजेचे आहे. याशिवाय खामगांव-पंढरपूर महामार्गावर मेगा कंपनीने मांजरा नदी पुलाच्या दोन्ही बाजूनी एक किमी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता दुरुस्त न केल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. या रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे, रिकामे दगड व उडणाऱ्या धुळीमुळे अनेक अपघात होऊन नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. तसेच रात्रीच्या वेळी वाहनांची गती कमी होत असल्याने वाहन लुटणे व चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. या गंभीर समस्येबद्दल सतत आंदोलने करून पाठपुरावा करूनही कंपनीने अद्याप कार्यवाही केलेली नाही. तसेच या कंपनीने केज शहर अंतर्गत भागात रस्त्याच्या कडेने नाली बांधकाम पूर्ण केलेले नाही. याशिवाय एमएमआरडीसी ने या महामार्गावर केज शहर अंतर्गत धारूर रोड वर अद्याप पथदिवे सुरू केलेले नाहीत. काम पूर्ण झाल्यानंतरही एखाद्या शहरातील मुख्य रस्त्यावर चार वर्षाहून अधिक काळ पथदिवे सुरू नसणे गंभीर बाब आहे. वरील दोन्ही कंपन्यांनी येत्या पंधरा दिवसात वरील कामे पूर्ण करावीत. अन्यथा समीतीच्या वतीने येत्या सोमवार दि. 5 फेब्रुवारी रोजी मांजरा नदी पुलावर व मंगळवार दि. 6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता केजडी नदी पुलावर समिती बेमुदत रस्ता रोको आंदोलन करत आहे. या आंदोलन काळात निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेस एमएमआरडीसी, संबंधित कंपन्या व प्रशासन जबाबदार राहील असे समितीने म्हटले आहे. या आंदोलनात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन ही समितीने केले आहे.