Site icon सक्रिय न्यूज

केजच्या पुलावर रास्ता रोको…..!

केज दि.६ – मागच्या कांही महिन्यांमध्ये कित्येकदा आंदोलने करूनही प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे केज विकास संघर्ष समिती च्या वतीने केजडी पुलावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. यावेळी सुमारे दोन किमी वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक पाऊण तास तुंबली होती.
                 शहरातील बसडेपो मंजुरी, बसस्थानकातील कंपाऊंड वॉल, सतत होणाऱ्या चोऱ्या व महिलांचे दागिने पळविणाऱ्या टोळ्यांवर नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कायम सुरु ठेवणे,  शौचालय नव्याने बांधणे, धारूर रोड व अंबेजोगाई- बीड मुख्य रस्त्यावरील पथदिवे तात्काळ सुरू करणे, केजडी नदीवरील पुलाचे काम पंधरा दिवसात पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी उपलब्ध करणे, केजडी नदी पुलाच्या दोन्ही बाजुंचा रस्ता दुरुस्त करणे, अंबेजोगाई-बीड रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कदमवाडी, कोरेगाव इत्यादी ठिकाणी रस्त्यावर तयार झालेले भेगा व कटाव तात्काळ दुरुस्त करा व लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाचे बांधकाम निविदा व कार्यादेश काढून काम तात्काळ सुरु करा. या प्रमुख मागण्यासाठी मंगळवारी (दि.६) सकाळी 11 वाजता केजडी नदी पुलावर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्वच संबंधीत कार्यालयाकडून वरील सर्व समस्यां लवकरात लवकर सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर समितीने आपले आंदोलन मागे घेतले.
                  यावेळी केजडी नदी पुलाच्या दोन्ही बाजुंनी दोन किमी अंतरावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
केजच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळ, एचपीएम कंपनी, राज्यपरिवहन महामंडळ आणि केज नगरपंचायत यांच्या अखत्यारीत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी समितीने या आंदोलनाची हाक दिली होती.
           सदरील आंदोलनात समितीचे हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे, आदेश देशमुख, शिवाजीराव ठोंबरे, संपत वाघमारे शेळके इत्यादी सह केजच्या विकासप्रेमी नागरिकांनी मोठा सहभाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शेअर करा
Exit mobile version