Site icon सक्रिय न्यूज

संतप्त शेतकऱ्याने मृत बकरे टांगले दवाखान्याच्या गेटला…..!

केज दि.७ – तालुक्यामध्ये एक अतिशय आश्चर्यजनक आणि तेवढीच वेदनादायी घटना समोर आली आहे. तालुक्यातील विडा येथे श्रेणी एक दर्जा असलेला पशुवैद्यकीय दवाखाना आहे. डॉक्टर ची जागा रिक्त असल्याने मस्साजोग येथील डॉक्टर कडे विड्याचा अतिरिक्त कारभार आहे आणि तेही हजर नसल्याने एका शेतकऱ्याच्या बकऱ्याचा जीव गेला आणि जीव गेल्यानंतर त्या बकऱ्याला शेतकऱ्याने परत न नेता चक्क दवाखान्याच्या गेटलाच ते मृत बकरे टांगले. त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

              तालुक्यातील विडा येथे श्रेणी एक दर्जा असलेला पशुवैद्यकीय दवाखाना असल्याने परिसरातील हजारो शेतकरी आपले पशुधन आजारी पडल्यानंतर त्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी घेऊन येतात. मात्र डॉक्टर ची जागा रिक्त असल्याने आणि कर्मचारीही अपुरे असल्याने शेतकऱ्यांना इतरत्र जावे लागते. आणि त्यादरम्यान अनेक पशुधनांचा जीवही जातो. असाच काहीसा प्रकार एका शेतकऱ्याबरोबर घडला. गुरुवारी दुपारी तीन वाजता अंधळेवाडी येथील सहदेव आंधळे शेतकऱ्याने त्याचे बकरे आजारी होते म्हणून विड्याच्या दवाखान्यात आणले. मात्र त्या ठिकाणी ना डॉक्टरचा ना कर्मचाऱ्यांचा पत्ता होता. त्या शेतकऱ्याने त्या ठिकाणचा अतिरिक्त कारभार असलेल्या श्री.जोगदंड डॉक्टरला अनेकदा फोन केले. परंतु डॉक्टर कांही पोहोचले नाहीत. त्यादरम्यान बकऱ्याचा जीव गेला. बकऱ्याचा जीव गेल्यानंतर शेतकरी संतप्त झाला आणि त्या शेतकऱ्याने ते मृत बकरे गावी परत न नेता दवाखान्याच्या गेटला टांगले आणि प्रशासना चा कारभार चव्हाट्यावर आणला. किमान आता तरी प्रशासन डॉक्टर नेमतील एवढीच माफक अपेक्षा.
              दरम्यान, सदरील घटनेबाबत तालुका पशु वैद्यकीय अधिकारी श्री.थळकरी यांच्याशी संपर्क केला असता डॉक्टर जोगदंड हे परिसरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी परभणी येथे घेऊन गेले असल्याचे सांगितले.
शेअर करा
Exit mobile version