केज दि.२० – उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात शिक्षण मंडळाकडून पूर्ण तयारी झाली असून कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळ सज्ज झाले आहे.त्या अनुषंगाने वेगवेगळ्या उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत.
एचएससी बोर्डाची परीक्षा उद्यापासून सुरुवात होत आहे. इंग्रजीच्या पेपरने परीक्षेची सुरुवात होत आहे. राज्यामध्ये लाखो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि त्याच अनुषंगाने केज तालुक्यातही एकूण दहा परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तालुक्यातील 3900 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. यामध्ये मागच्या वर्षी पेक्षा एका केंद्राची भर पडली असून आता शहरातील वि.दा. कराड महाविद्यालयातही बारावीची परीक्षा होणार आहे. परीक्षा पार पाडण्यासाठी केज गट साधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी श्री. बेडसकर यांनी संपूर्ण तयारी केली असून प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक नेमण्यात आलेले आहे. बैठे पथकामध्ये तीन सदस्यांचा समावेश असणार आहे तर गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचेही एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर गट साधन केंद्रातून प्रश्नपत्रिका घेऊन जाण्यासाठी व उत्तरपत्रिका गट साधन केंद्रामध्ये पोहोच करण्यासाठी रनरचीही नेमणूक करण्यात आल्याची माहिती श्री. बेडसकर यांनी दिली.
दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचा ताणतणाव न घेता अगदी प्रसन्न मनाने परीक्षा द्यावी असे आवाहनही श्री. बेडसकर यांनी केले आहे.