केज दि.२६ – तालुक्यातील बनसारोळा येथे अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या गोडाऊन फोडून गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले २ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ७० क्विंटल सोयाबीन लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
बनसारोळा ( ता. केज ) येथील दत्तात्रय बालासाहेब काकडे यांच्या क्रांतीज्योती ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे बनसारोळा हद्दीत इस्थळ रस्त्याला शेत गट नं. ८३ मध्ये सोयाबीन साठवणुकीचे पत्र्याचे गोडाऊन आहे. त्यांनी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून या गोडाऊनमध्ये १७०० क्विंटल सोयाबीन साठवून ठेवले होते. २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता गोडाऊनला कुलूप लावून घरी गेले. दोन शेतगडी गोडाऊन समोरील बाजुस झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी गोडाऊनच्या पाठीमागील खिडकीचे गज वाकवून खडकी तोडून गोडाऊनमध्ये ठेवलेले २ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ७० क्विंटल सोयाबीनचे ११४ कट्टे लंपास केले. दत्तात्रय काकडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि मच्छिद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक संपत शेंडगे हे तपास करताहेत.