केज दि.१६ – येथील वर्दळीच्या ठिकाणी मेन रोडवर दुपारी उभ्या केलेल्या मोटार सायकलच्या डिग्गी तोडून १ लाख २७ हजार रु. ची चोरी केल्याची घटना एका किराणा दुकानासमोर घडली.तर अवघ्या बारा तासाच्या आत केज शहरातील उमरी रोडवरील एका घरात घुसून घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली.
अधिक माहिती अशी की, दि. १५ मार्च रोजी दुपारी २.३० च्या सुमारास गोविंद मधुकर सोनवणे रा.सारणी (आ.) यांनी कळंब रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून स्वतः च्या खात्या मधून १लाख २७ हजार रु. काढले व ते पैसे त्यांनी त्यांची मोटार सायकलमध्ये ठेवून दुचाकी (एम एच ४४/पी २९६४) मिटकरी यांच्या किराणा दुकानाच्या समोरील रोडवर उभी करून ते एका दुकानात गेले. मात्र त्यांनी परत येऊन
पाहिले असता मोटार सायकलच्या डीग्गीचे झाकण उचकटलेले दिसले. त्यांनी डिग्गीत पाहिले असता त्यातील १ लाख २७ हजार रु. व बँकेचे पासबुक कोणीतरी अज्ञात चोरट्यानी पळविले असल्याचे निदर्शनास आले. गोविंद मधुकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दरम्यान, दुपारची ही घटना घडल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री केज शहरातील उमरी रोडवरील नितीन गणपत गायकवाड यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून दरवाज्याची आतील कडी तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील सोन्याचे गंठन, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली.त्यामुळे वारंवार होत असलेल्या चोऱ्या पाहता पोलिसांचा धाक उरलाय की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला असून यामध्ये सर्वसामान्य लोकांना नाहक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.