बीड दि.१६ – राजकीय पुढार्यांसह सर्वसामान्य नागरिकांना ज्या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची उत्सुकता लागलेली होती तो मुहूर्त अखेर ठरला असून लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मागच्या काही दिवसापासूनच अंग झटकून कामाला लागले आहेत. देशाच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. देशामध्ये लोकसभेची होणारी निवडणूक ही एकूण सात टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक मतदान 19 एप्रिल ला होणार. दुसरा टप्पा 26 एप्रिलला तिसरा टप्पा 7 मे ला. चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे तर सातवा टप्पा 1 जून ला मतदान होणार असून निकाल 4 जूनला घोषित होईल. यामध्ये असून महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या 48 जागांसाठी निवडणूक 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. मागच्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्याच दिशेने वाहू लागल्याने येत्या निवडणुकीमध्ये मतदार नेमके कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महायुती असेल, महाविकास आघाडी असेल किंवा इतर काही घटक पक्ष असतील त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या मतदार संघावर दावा सांगितल्यामुळे अद्यापही कुठल्याच पक्षाने आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचा समावेश असल्याने जागा वाटपाबाबत अद्याप त्यांचाही निर्णय झालेला नाही. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांचेही जागावाटप अंतिम झाले नसून वंचित बहुजन आघाडी ही कोणाकडे सामील होते की स्वतंत्र लढते हे आणखी ठरायचे बाकी आहे.
महाराष्ट्रामध्ये 48 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या तारखेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते ती तारीख जाहीर झाल्याने निवडणूकीचे वारे वेगाने वाहणार आहेत. दरम्यान, देशात सुमारे 97 करोड मतदारांची अधिकृत नोंदणी असून 55 लाख ईव्हीएम मशीन सज्ज आहेत.तर दिड कोटी निवडणूक अधिकारी असणार आहेत. त्यामुळे साडे दहा लाख बुथवर मतदार कुणाला कौल देतात हे अवघ्या कांही दिवसांतच समोर येणार आहे.
ठळक मुद्दे….!
@ बीड चे मतदान चौथ्या टप्प्यात 13 मे
@ महाराष्ट्रात 19, 26 एप्रिल, 7, 13, 20 मे
@ मतदाराला कांही तक्रारी असल्यास सी – व्हिजिल ऍप वर तक्रार नोंदवता येणार.
@ निवडणुक हिंसामुक्त होणार.
@ बोगस मतदान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई.
@ देशात 1.82 कोटी नवीन मतदार.
@ पैशांचा गैरवापर निवडणुकीत होऊ देणार नाही.
@ 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदार.
@ 85 वर्षांवरील मतदारांना घरीहून मतदान करता येणार.
@ 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार.
@ सोशेल मीडियावर खोट्या बातम्या, अफवा पसरवणाऱ्यांवर राहणार करडी नजर.
@ दारू, पैसे आणि साड्या वाटणाऱ्यांवर सक्त कारवाई होणार.
@ आरोपांचा आणि भाषेचा स्तर घसरल्यास होणार कारवाई.
@ प्रचारात वैयक्तिक टीका चालणार नाही.
@ लहान मुलांचा प्रचारात वापर करता येणार नाही.
@ जास्तीतजास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन.
@ देशातील 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार.
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
4 जूनला लोकसभेचा निकाल