केज दि.१८ – शहरामध्ये जे प्रमुख कार्यालये आहेत त्या कार्यालयामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून प्रभारी राज सुरू आहे. कित्येक कार्यालयामध्ये पदाचे अधिकारी नसल्याने वारंवार कारभार हा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हाती जातो. मात्र यामध्येही काही कर्तव्यदक्ष अधिकारी हे आपले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. परंतु अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देणे आणि त्यांच्या पदाचा अवमान करणे असे प्रकार घडू लागल्याने केज शहरांमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी राहणे अवघड झाले आहे.
केज गट साधन केंद्रामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून अनेक जणांनी काम केले आहे. मध्यंतरी एक पदाचे गटशिक्षणाधिकारी आले परंतु अवघ्या काही दिवसांमध्येच ते सेवानिवृत्त झाल्याने पुन्हा प्रभारी राज सुरू झाले. पदाचे गट शिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवा जेष्ठतेनुसार जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. मात्र त्यांनी पदभार घेतल्यापासूनच काहींना ते काही रुचलेले दिसत नाही. लक्ष्मण बेडसकर यांनी नांदेड, केज, माजलगाव अशा ठिकाणी शिक्षण विभागामध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळे ते अनुभवी आहेत. आणि शिक्षण क्षेत्राचा गाडा अभ्यास आहे. आपले कर्तव्य बजावताना अतिशय नियमाने आणि काटेकोरपणे आपले काम करत असतात. परंतु अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यालाही त्रास होत असेल तर अवघड आहे. त्यामुळेच केज शहरांमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी राहणे पसंत करत नाहीत. आणि असाच काहीसा प्रकार लक्ष्मण बेडसकर यांच्या बाबतीतही झाला.
लक्ष्मण बेडसकर हे दिनांक 14 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता घराकडे जात असताना पंचायत समिती समोर चिंचोली माळी जि. प.शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर ढाकणे, लाखा जि. प.शिक्षक महादेव मुंडे आणि सारणी जि. प.शिक्षक बाबू कांबळे या तिघांनी त्यांना थांबवले व तू आम्हाला त्रास का देतो असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परंतु हा प्रकार घडत असताना बेडस्कर यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडे हाक दिली आणि काही कर्मचारी त्यांच्याकडे येत असल्याचे पाहताच संबंधित तिघेजण त्या ठिकाणाहून पळून गेले.
सदरील प्रकार हा नेमका कोणत्या त्रासातून झाला ? या तिघांना बेडसकर यांनी नेमका काय त्रास दिला ? हे मात्र गुलदस्त्यात आहे. परंतु एखादा अधिकारी त्रास देत असेल तर त्यासंबंधी त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठाकडे रीतसर आपले म्हणणे मांडता येते. मात्र असे न करता थेट एखाद्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे आणि धमकावणे हे मात्र संबंधित अधिकाऱ्याचा आणि पदाचा अवमान करण्यासारखे आहे. कर्तव्य बजावत असताना अनेक जण दुखावले जातात मात्र दुखावण्याचे नेमके कारण काय हे ते सांगू शकत नाहीत.
दरम्यान, एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी जर आपले कर्तव्य चोखपणे बजावत असेल आणि त्याचे काही चुकले जरी असेल तरीही रीतसर आणि सविनय मार्गाने त्याच्याविरुद्ध दाद मागणे हे नियमाला धरून असते. मात्र थेट अंगावर जाऊन धमकावणे आणि शिवीगाळ करणे हे शिक्षकांना शोभा देणारी गोष्ट नाही. बेडसकर यांच्या तक्रारीवरून संबंधित तिघांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.