बीड दि.२७ – थट्टा, मस्करी ही एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. परंतु नेहमी एकमेकांना थट्टा मस्करी ने बोलणाऱ्यामध्येही कधीकधी वाद एवढा विकोपाला जातो की यामध्ये अघटीत घडते. त्यामुळे केवळ आपल्याला बरं वाटतं, ऐकणाऱ्यालाही बरं वाटतं म्हणून वारंवार चेष्टा मस्करी करणे हे महागात पडू शकतं. आणि अशीच एक घटना माजलगाव तालुक्यामध्ये घडली असून दोन कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
पवारवाडी ( ता. माजलगाव ) शिवारात मंगळवारी ( दि. २६ ) दुपारी कुंडलिक धुमाळ दोन मित्रासोबत अशोक खामकर यांच्या शेतातील शेत तलावाजवळ बसला होता. यावेळी गावातीलच मित्र संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे तेथे आला. यावेळी कुंडलिक धुमाळ याने संभा मोरे याला तोतरे बोलण्याच्या व्यंगावरून नेहमीप्रमाणे चिडविले. यावरून दोघात मोठा वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. रागाच्या भरात चिडलेल्या संभा मोरे याने धुमाळला शेत तलावात ढकलून दिले आणि त्याच्या छातीवर बसून श्वास कोंडेपर्यंत त्याला बुडवून ठेवले.त्यामुळे या घटनेत धुमाळचा जीव गेला.
याप्रकरणी मयताचे वडील भीमराव साधू धुमाळ यांच्या फिर्यादीवरून संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०२ भादवी नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालक कोळी, सपोनि विजय जानवळे हे करत आहेत.
दरम्यान, मर्यादा ओलांडून केलेली कृती नेहमीच संकट ओढून आणते. त्यामुळे आपण बोलताना समोरच्याची मानसिकता ओळखून बोललेले बरे…!