केज दि.२८ – तालुक्यातील बनसारोळा येथील संत श्रेष्ठ सावता महाराज मंदिर स्थापना दिनानिमित्त दिनांक ३१ मार्च ते ०७ एप्रिल २०२४ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याचे वैशिष्ठे म्हणजे गाथा पारायण, भजन व कीर्तन हे सर्व धार्मिक कार्यक्रम आठ दिवस महिलाच करणार असल्याने या सोहळ्याबाबत परिसरात उत्सुकता वाढली आहे.
धार्मिक सोहळ्याबाबत माहिती देताना मंडळाचे सदस्य आणि पत्रकार बापूसाहेब गोरे आणि दत्ता गोरे यांनी सांगितले की श्री संतश्रेष्ठ सावता महाराज भक्तगण बनसारोळा हे मंडळ गेली १५ वर्षापासून दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करीत आहेत. या वर्षी दिनांक ३१ मार्च पासून प्रथमच मंडळाच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रसिद्ध महिला किर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तास महिला कीर्तनकारांच्या कीर्तनरुपी सेवा देणार असून भाविकांना भक्तीरसाची चव चाखायला मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत श्री.गोरे म्हणाले की, दि.३१ मार्च पासून दिनांक ६ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत आळंदी येथील ह.भ.प.भागवताचार्य मीराताई शिंदे या ज्ञानेश्वरी वाचन करणार आहेत व याच दिवशी रात्री बार्शी येथील ह. भ. प. कु. वैभवीताई साखरे यांच्या मधुर कीर्तनाने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. तर सोमवार दि.०१ एप्रिल रोजी ह.भ.प.सौ.शीतलताई सुरनर ( कळगाव,उदगीर), दि.०२ एप्रिल रोजी ह.भ.प.सौ सोनालीताई नाईक ( शेवगाव,अहमनगर), दि.०३ एप्रिल ह.भ.प.सौ योगीताताई देवकर (पैठण,औरंगाबाद ), दि. ०४ एप्रिल ह.भ.प.सौ. कावेरीताई घुमरे ( नाशिक ) दि.०५ एप्रिल ह.भ.प.सौ. आशाताई राऊत ( लातूर ) दि.०६ एप्रिल ह.भ.प.सौ. संगीताताई कोरडे ( माजलगाव )आणि दि ०७ एप्रिल रोजी श्रीरामपुराच्या कु. आरतीताई शिंदे यांच्या भावपूर्ण काल्याच्या कीर्तनाचे सोहळ्याची सांगता होणार आहे.
दरम्यान, कीर्तन हा महाराष्ट्रीय संस्कृतिचा अमूल्य ठेवा आहे. भागवत धर्माची ध्वजा फडकविणाऱ्या या कीर्तन सोहळ्याचा भाविक भक्तांनी आनंद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.