केज दि.१५ – बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुपरीचीत असलेले आदर्श शिक्षक आणि विनोबा भावे यांचे शिष्य खंदारे गुरुजी यांचे वार्धक्याने सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान लातूर येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८७ वर्षे होते.
खंदारे गुरुजी म्हणून परिचित असलेले वासुदेव बंडोबा खंदारे हे मूळचे केज तालुक्यातील वरपगाव येथील रहिवासी. मात्र सध्या केज मध्ये धारूर रोडवर ते वास्तव्यास होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली. तसेच विनोबा भावे यांचे विचार आत्मसात करून आपणही काहीतरी तरुणांसाठी करावं या ध्येयाने प्रेरित होऊन ध्यान आणि प्राणायामाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो तरुणांना अध्यात्माच्या मार्गावर आणले. तसेच कित्येक तरुणांना व्यसनापासूनही दूर केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ५००० शिष्यांचा परिवार असलेल्या खंदारे गुरुजींना वृद्धापकालीन काही आजारामुळे लातूर येथे एका खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी दिनांक १५ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
दरम्यान खंदारे गुरुजी यांच्यावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता केज (गो शाळा धारूर रोड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. खंदारे गुरुजींच्या निधनामुळे त्यांच्या शिष्यगणांवर शोककळा पसरली असून पंचक्रोशीत ही हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा मोठा परिवार आहे.