Site icon सक्रिय न्यूज

डॉ. सुधिर फत्तेपुरकर आणि डॉ. दिनकर राऊत यांनी दिला आरोग्याचा मूलमंत्र……!

केज दि.२३ – जीवनातील ताणतणाव, अति हव्यास, असंतुलित आहार बदलती जीवनशैली या सर्व बाबी अनेक प्रकारे आपल्या शरीर स्वास्थ्यावर परिणाम करत असतात. यामुळे आपल्या शरीराच संतुलन बिघडतं आणि मग आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आपला आहारविहार आणि जीवनशैली कशी असावी याचा मूलमंत्र डॉ.सुधीर फत्तेपुरकर तसेच डॉ.दिनकर राऊत यांनी दिला. ते स्व. विश्वंभर कोकीळ जीवन विकास व्याख्यानमालेत बोलत होते.
                      केज येथील स्वामी विवेकानंद शाळेमध्ये दि. २१ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून लातूर येथील डॉ. सुधिर फत्तेपूरकर, अश्विनी ॲक्सिडेंट अँड न्यूरोकेअर सेंटर लातूर हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून डॉ. दिनकर राऊत, योगिता नर्सिंग होम व बालरुग्णालय केज, हे उपस्थित होते. याप्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे, उपाध्यक्ष डॉ. पांडुरंग तांदळे, नारायण अंधारे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैला इंगळे, गणेश कोकिळ आदी उपस्थित होते. दुसरे पुष्प गुंफताना “मानवी जीवनातील आरोग्य संपन्नता” या विषयावर बोलताना डॉ. सुधिर फत्तेपूरकर म्हणाले, सध्याच्या काळामध्ये आरोग्य संपन्नतेपेक्षा आर्थिक संपन्नतेवर अधिक भर दिला जात आहे. जे आजार वयाच्या सत्तरी नंतर व्हायचे ते आता तिसीनंतर होत आहेत, त्यामध्ये पक्षाघात ( लकवा ) पक्षाघात म्हणजे मेंदू आघात, जेव्हा रक्त नलिका बंद होते किंवा फुटते म्हणजेच मेंदूच्या पेशी मृत होतात तेव्हा पक्षाघात होतो. ही एक आपत्कालीन स्थिती आहे. याप्रसंगी बोलताना, हा आजार कोणत्या कारणामुळे होतो, तो कसा ओळखावा, त्याची वैशिष्ट्ये कोणती, याविषयी मार्गदर्शन करताना प्रोजेक्टरच्या मदतीने उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केले. शेवटी ते म्हणाले, “उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, सुखी जीवनाचा हाच मंत्र खरा”
         तर अध्यक्षीय समारोपात डॉ. दिनकर राऊत यांनी, आरोग्याची आहार, व्यायाम, शांतता, स्वच्छता, मानसिकता ही वैशिष्ट्ये आहेत, आजच्या काळामध्ये अनुभवासह जीवनामध्ये अपडेट होणे गरजेचे आहे. संतुलित आहार हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. आहार हा शाकाहारी व सात्विक असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने जीवन जगत असताना आनंद मिळणाऱ्या गोष्टींमध्ये रमले पाहिजे असा सल्ला दिला.
शेअर करा
Exit mobile version