किल्लेधारुर दि.31 – Accident आयशर टेम्पो व रिक्षाची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धारूर घाटामध्ये शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. माऊली भास्कर घुले वय ३० वर्षे रा. गावंदरा असे मयत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
धारूर येथील घाटात धोकादायक वळणामुळे अपघाताचे सत्र सतत सुरूच आहे. शुक्रवारी दुपारी धारूर कडून आयशर टेम्पो तेलगावकडे जात होता. यावेळी तेलगाव कडून येणाऱ्या रिक्षास घाटातील धोकादायक वळणाच्या ठिकाणी समोरा -समोर धडक झाली. त्या अपघातात रिक्षाचालक माऊली भास्कर घुले गंभीर जखमी झाला. त्यास स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातामध्ये आयशर टेम्पो व रिक्षाचा समोरील भाग चकाचूर झाला आहे. रस्त्यावर अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहने बराशीमध्ये गेले.
दरम्यान, धारूर घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून गुरुवारी रात्रीही एका दुचाकी स्वारास टिप्परची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अवघ्या २४ तासात घाटामध्ये अपघातामुळे दोघांचा बळी गेला आहे.