Site icon सक्रिय न्यूज

मर पाठोपाठ आता मावा तुडतुडेचा प्रादुर्भाव; कपाशीचे क्षेत्र बाधित…!

मर पाठोपाठ आता मावा तुडतुडेचा प्रादुर्भाव; कपाशीचे क्षेत्र बाधित…!

Oplus_131072

सोयगाव दि. ११ – (बाळू शिंदे) – आकस्मिक मर च्या पाठोपाठ आता कपाशी पिकांवर मावाचा प्रादुर्भाव शनिवारी पासून आढळून येत आहे. आधीच आकस्मिक मर आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचा मावा कपाशीच्या पानांवर दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. यावर उपाय योजना करण्यासाठी महागडे कीटकनाशके फवारणी सुरू आहे. मात्र तालुका कृषी विभागाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना देण्यात येत नाहीत.
         यंदाच्या खरिपाच्या हंगामात सोयगाव तालुक्यात ३१ हजार ४५७ हेक्टरवर कपाशी ची लागवड केली आहे. जुलै महिन्यात पूर्णवाढ झालेल्या कपाशी वर आकस्मिक मर चा प्रादुर्भाव झाला. ऑगस्ट पर्यंत हा प्रादुर्भाव असतानाच अचानक शनिवार पासुन कपाशीच्या हिरव्यागार पानांवर मागील बाजूस पांढऱ्या व काळ्या रंगाच्या माव्याचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पांढरा व पिवळ्या रंगांच्या माव्या वर उपाय योजना साठी शेतकरी महागडी कीटकनाशके फवारणी करत आहेत. त्यामुळे  कपाशी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. मात्र तालुका कृषी विभाग गायब असल्याचे दिसत आहे. कपाशीसह खरीप हंगाम संकटात असताना कृषी विभागाचे कृषी सहायक शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नसल्याचे चित्र आहे.
              दरम्यान आकस्मिक रोगाचा प्रादुर्भाव तालुका कृषी विभागाने गांभीर्याने घेतला नसतांना त्यातच माव्याचा प्रादुर्भावाने डोके वर काढले आहे. कपाशीची पाने या माव्याचा प्रादुर्भावामुळे आकसून जात झाडे सुकत आहेत. त्यामुळे पुन्हा मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकारी मदन शिदोदिया यांचेशी संपर्क केला असता गावनिहाय कृषी सहायक यांना क्रॉप सॅप च्या माध्यमातून  निरीक्षण करून रोगाचा विळखा आढळून आल्यास तातडीने निरीक्षणाची नोंद घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
शेअर करा
Exit mobile version