केज दि.12 – बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांची तहान भागवणारे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजीची दुपारी ३ वाजताची मांजरा धरणाची पाणी पातळी ६४१.३ मी. असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५.५३ टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) अशीच पर्जन्य वृष्टी राहून येवा (Inflow) असाच राहीला तर केंव्हाही धरण निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा मांजरा नदीमार्गे सोडावा लागणार आहे.
दरम्यान, मांजरा नदी काठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहीलेले नागरीक यांना सावधानतेचा इशारा अ. न. पाटील (कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1 लातूर ) यांनी दिला असून पुढील कार्यवाहीसाठी बीड, लातूर, धाराशिव आणि बिदर (कर्नाटक) जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे.