Site icon सक्रिय न्यूज

देशाच्या अखंडतेसाठी मुक्तीसंग्राम महत्वाचा ठरला….! 

देशाच्या अखंडतेसाठी मुक्तीसंग्राम महत्वाचा ठरला….! 
छत्रपती संभाजीनगर, दि.१८ – मराठवाडा मुक्तीसंग्राम हा काही केवळ विलीनीकरणाचा लढा नव्हता तर देशाच्या अखंडतेसाठी हा लढा महत्वाचा ठरला, असे प्रतिपादन अभ्यासक डॉ.शिरीष खेडगीकर यांनी केले.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी (दि.१७) विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ.संजय साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे विश्वस्त डॉ.शिरीष खेडगीकर यांचे ’मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे पर्व’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १३ महिने हैद्राबाद संस्थानातील जनतेला निजामाशी संघर्ष करावा लागला. मराठवाडा, तेलंगणा व कर्नाटकातील काही भाग या लढयानंतर स्वतंत्र झाला. या लढयाला निजामास सांप्रदायिक स्वरुप आणावयचे होते. मात्र महात्मा गांधीजी यांनी दिलेला सल्ला स्वामी रामानंद तीर्थ यांनी ऐकला. हा संपुर्ण लढा सर्व समाज घटकांनी सामाजिक सलोखा राखून जिंकला. विशेषतः या लढ्यामध्ये नव्याने सुरू झालेल्या शाळांमधील शिक्षक संस्थाचालक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले, असेही डॉ.खेडगीकर म्हणाले. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा यांचा विद्यापीठाच्यावतीने सन्मान करण्यात आला. धार्मिक सण उत्सावाचे आपले स्वरुप बदलून सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा श्रीमती लढ्ढा यांनी व्यक्त केली.
मराठवाडयाचा समग्र इतिहास लेखनाची गरज – मा.कुलगुरु
मराठवाडा हा महत्वाचा मराठी भाग असून येथील मुक्तीसंग्राम, चळवळी, अर्थव्यवस्था, साहित्य, कला, संस्कृती यांचे समग्र लेखन होणे गरजेचे आहे, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षीय समारोपात म्हणाले. प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक रवदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. सामान्य प्रशासन विभागातील डॉ. कैलास पाथ्रीकर, संजय लांब, भारत वाघ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमापुर्वी मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला.सुरक्षा अधिकारी बाळु इंगळे यांनी संचालन केले.
शेअर करा
Exit mobile version