मुंबई दि.१९ – राज्यातील ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयातील मुलं मुली स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मागे पडू नयेत, तेही महागड्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यावेत या उद्देशाने राज्यातील सर्वच शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मागच्या काही वर्षांपासून आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशाने पालकांचा कल सीबीएसई पॅटर्नकडे असल्याचे दिसू लागले आहे. पाल्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांनीही अधिकारी व्हावं अशी पालकांची मनोमन इच्छा असते. परंतु मोठमोठ्या शहरांमध्ये आणि सर्व सोयी असलेल्या सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये सर्वसामान्य पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे पाल्यांचा प्रवेश घेणे शक्य होत नाही. आणि त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच सर्वसामान्य कुटुंबातील मुलं हे मागे पडताना दिसत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील तिसरी ते बारावी पर्यंतच्या सर्वच शाळा महाविद्यालयामध्ये सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
दरम्यान आर्थिक परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना भरमसाठ फीस असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांनाही आपल्या जवळच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न नुसार शिक्षण घेणे शक्य होणार असल्याने या निर्णयाचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होताना दिसत आहे.