बीड दि.७ – केज पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेले ऑनलाइन चक्री, तिर्रट, मटका आदी अवैध धंद्यांवर बीड एलसीबीने छापे मारले असून, यामध्ये जुगाराचे साहित्यासह १ लाख ५५ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला केज मधील अवैध धंदे दिसले पण स्थानिक पोलिसांना याची कानोकान खबर नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
केज पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षकांना मिळाली होती. या सर्व ठिकाणी छापे मारण्यासाठी एलसीबी पथकाला आदेश देण्यात आले होते. त्यावरून पंचायत समीतीच्या बाजूस उमरी रोडवर फारुकी कॉम्प्लेक्स येथे ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर छापा मारला असता तेथे खेळताना सय्यद आसेफ युसुफ, सय्यद गज्जु उस्मान दोघे रा. इस्लामपुरा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून ७२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दुसरी कारवाई संतोष लॉजच्या बाजूला तिर्रट जुगार खेळणारे आरोपी ज्ञानेश्वर उध्दव हरिदास रा. केज, विशाल युवराज कसबे रा. चिंचोली माळी, शहादेव महादेव शिंदे रा. केज, शंकर भिमराव गायकवाड रा. चिंचोली माळी, रवि काशिनाथ काळे रा. केज, आकाश राजाभाऊ रा. कानडी, सतिष वसंत काळे रा. केज, विलास काशिनाथ जाधव रा. केज यांना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य व नगदी ४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसरी कारवाई केज शहरातील मटका अड्ड्यावर करण्यात आली. येथे छापा मारुन आरोपी इस्माईल मसीयोद्दीन इनामदार रा. केज, संकेत भारत जाधव रा. अंबाजोगाई, प्रमोद प्रदिप सत्वधर रा. केज, गणेश सुधीर खराडे रा. केज यांना ताब्यात घेऊन मटका जुगाराचे साहित्य व नगदी रक्कम असे ३७ हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौथी कारवाई बसस्थानक जवळ असलेल्या ऑनलाइन अवैध जुगार अड्ड्यावर छापा मारला असता येथे एलइडी स्क्रीनवर ऑनलाईन फन गेम नावाचा जुगार पैसे घेवून खेळत व खेळवीत असताना आरोपी सुभाष उत्तरेश्वर जाधव रा. मर्कज मस्जीद जवळ केज यास ताब्यात घेवून जुगाराचे साहित्य व नगदी असा ४० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरील चार कारवाईतील सर्व आरोपींवर केज पोलीस ठाणे येथे जुगार महाराष्ट्र कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सपोनि जोनावल, पोउपनि खेडकर, श्री. गायकवाड, श्री. घोडके, श्री. ठोंबरे, श्री. शिंदे, श्री.शेलार, श्री. वाघमारे, श्री. शेख, श्री. चव्हाण, श्री. राठोड, श्री. जोगदंड, बागवान सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांचे चार वेगवेगळे पथक तयार करुन केली आहे.