Site icon सक्रिय न्यूज

दवाखान्यात घुसून रुग्णावर हल्ला….!

दवाखान्यात घुसून रुग्णावर हल्ला….!

बीड दि.८ – रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यास एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कट मारून खाली पाडत जखमी केले. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात जाऊन जखमी दुचाकीस्वारासह त्यांच्या नातेवाईकांना १०-१२ अज्ञात गुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार बीड शहरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सोमवारी (दि.७) सकाळी साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपी निष्पन्न करत अवघ्या २४ तासात टोळक्यातील ४ गुंडांना बेड्या ठोकत चांगलीच ‘अद्दल’ घडविली.

रामेश्वर परमेश्वर कदम (वय ३६ रा.शिदोड ता.बीड) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी शहरातील एका खाजगी शोरूममध्ये नोकरी करतात. नेहमीप्रमाणे हे दाम्पत्य दुचाकीवरून बीडमध्ये आले होते. रस्त्यात असताना दोन तरुणांनी सतत दुचाकी मागे-पुढे करत दाम्पत्याचा पाठलाग केला. त्या दोघांनी मोंढा रोडवरील बिंदुसरा नदीच्या पुलावर असताना दाम्पत्याच्या दुचाकीला कट मारत खाली पाडून गंभीर जखमी केले. त्याठिकाणाहून रामेश्वर कदम हे जखमी पत्नीला घेऊन शहरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी गेले. पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर औषधी घेण्यासाठी खाली मेडिकलमध्ये गेले असता दुचाकीवर येऊन कट मारत खाली पडणाऱ्या दोन अज्ञात तरुण त्यांच्यासोबत दहा-बारा गुंड घेऊन आल्याचे दिसले. त्या टोळक्याने फिर्यादीस चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना विरोध केला असता सलाईन लावण्याच्या रॉडने डोक्यात व नाकावर मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना देखील टोळक्याने मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामेश्वर कदम यांच्या तक्रारीवरून १०-१२ अज्ञात गुंडांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतीने फिरविली. सपोनि.बाबा राठोड, सहायक फौजदार बाबासाहेब सिरसाट, पो.कॉ. आशपाक सय्यद, मनोज परजने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तर सायबर सेलचे पो.कॉ.विक्की सुरवसे यांनी तांत्रिक माहिती तपासून आरोपी निष्पन्न केले. आरोपींचा अवघ्या २४ तासात शोध घेत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. उर्वरित आरोपींना शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

आरोपी निघाले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासून आरोपी निष्पन्न केले. हल्ला करणाऱ्या टोळक्यातील आनंद बाबुराव दहिवाळ, मंगलसिंग लक्ष्मणसिंग कपूर, आशिषसिंग किरणसिंग कपूर, संग्रामसिंग भारतसिंग कपूर (सर्व रा.नागोबा गल्ली, पेठ बीड) अशी चार आरोपीं अटक केले आहेत. सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यातील काही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पेठ बीड भागात गुंडगिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

शेअर करा
Exit mobile version