Site icon सक्रिय न्यूज

वेषांतर करून केज पोलिसांनी केला अट्टल गुन्हेगार जेरबंद

बीड दि.23 – जिल्ह्यातील वाळूमाफिया तसेच अन्य अट्टल गुन्हेगार यांच्या विरुद्ध बीड पोलिसांनी चांगलीच मोहीम उघडली असून अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून केज तालुक्यातील एका अट्टल गुन्हेगाराला केज पोलिसांनी वेषांतर करून जेरबंद केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
       पोलीस अधीक्षक बीड यांचे सूचनेवरून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन पोलीस ठाणे केज यांनी दिनांक 1/ 8 /2020 रोजी विक्रम शिवराम शिंदे (वय वर्ष 36) राहणार पिंपळगाव घोळवे ता. केज यांचे विरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत माननीय जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता. सदर स्थानबद्ध विरुद्ध पोलीस ठाणे केज नेकनूर, यु. वडगाव येथे दरोडा टाकणे, चोऱ्या करणे, दंगा करणे घातक शस्त्र बाळगणे तसेच मारहाणीचे इतर गुन्हे दाखल आहेत. एकूण दहा गुन्ह्यांची नोंद पोलिस अभिलेखावर आहे. सदरील इसमावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांची त्याच्यावर करडी नजर होती. सदर इसमावर यापूर्वी सीआरपीसी कलम 110 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तसेच मुपोका 55 प्रमाणे सदर इसमावर कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईला न जुमानता गुन्हे करण्याचे चालूच ठेवत होता. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी राहुल रेखावार बीड यांनी दिनांक 19/ 8/ 2020 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्यांतर्गत आदेश पारित करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन हरसुल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबद्ध करणेबाबत दिनांक 19/ 8/ 2020 रोजी आदेशित केले होते. त्यानंतर पोलिस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभूवन यांना दिल्या होत्या.
      दरम्यान गोपनीय खबरऱ्याच्या आधारे सदर स्थानबद्द इसमास पिंपळगाव तालुका केज येथून ताब्यात घेतले. सदरची कारवाई ही केस पोलिसांनी वेषांतर करून शेतकऱ्यांच्या वेषात जाऊन अत्यंत चलाखीने व शिताफीने सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतले व पोलीस ठाणे केज येथे हजर केले. सदरील गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई करून योग्य पोलिस बंदोबस्तात हरसुल कारागृह औरंगाबाद येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक आंबेजोगाई श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी आंबेजोगाई राहुल धस, पोलीस निरीक्षक भारत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार अभिमन्यू औताडे, पोलीस स्टेशन केज येथील पोलीस कॉन्स्टेबल मुंडे, नामदास, लोखंडे यांनी केलेली आहे. भविष्यातही गुंडगिरी करणारे, कायद्याला न जुमानणारे व वाळू माफिया यांच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत.
शेअर करा
Exit mobile version