Site icon सक्रिय न्यूज

केज विधानसभा मतदार संघात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाचा फायदा कुणाला ? अन फटका कुणाला….?

केज विधानसभा मतदार संघात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाचा फायदा कुणाला ? अन फटका कुणाला….?
केज दि.२१ – विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आयाराम गयारामांचीही मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. कुठे रुसवे फुगवे तर कुठे बंडखोरी हे सर्व समोर येत आहे. मात्र ज्यांना सत्तेची हवा लागलेली आहे अशा पदाधिकाऱ्यांना खुर्ची सोडायचं जीवावर आलेलं आहे. परंतु दिवसेंदिवस वेग घेत असलेल्या घडामोडी काहीसं चित्र बदलणाऱ्या दिसून येत आहेत. आणि यातच मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय जाहीर केला आहे त्याचा फायदा नेमका कुणाला होणार ? आणि फटका कुणाला बसणार ? हे निकालानंतरच दिसून येणार आहे.
             रविवारी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकी संदर्भात भाष्य केले. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची खात्री आहे तिथे उमेदवार उभे करायचे, राखीव मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे न करता आपल्या विचाराच्या उमेदवाराला सहकार्य करायचे असे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये केज विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदार संघही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे इथे उमेदवार उभा करण्याचा प्रश्नच येत नाही. मागच्या कित्येक वर्षांपासून या मतदारसंघावर काही अपवाद वगळता मुंदडा कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आमदार नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत नाट्यमयरीत्या भाजपामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा खुर्ची मिळवली. मात्र यावेळी चित्र जरासे वेगळे आहे. मागच्या १४ महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र काढलेले आहे. जरांगे पाटील यांच्या विचाराला आणि त्यांच्या हाकेला ओ देत सकल मराठा समाज आरक्षणासाठी एकवटला आहे. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने वेळोवेळी आरक्षणाची या सरकारकडे मागणी केली. मात्र सरकारने काही मागण्या मान्य जरी केल्या असल्या तरी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे या सरकारवर आंदोलकांचा रोष आहे. केज विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या अर्थातच महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांची उमेदवारी पहिल्याच यादीत घोषित झालेली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांच्या निर्णयामुळे महायुतीच्या उमेदवाराला मोठा धोका निर्माण झाला आहे.
             एवढेच नव्हे तर मागच्या काही महिन्यांपासून रिपाईनेही केज विधानसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे. आणि ते महायुती मधील एक घटक पक्ष आहेत. परंतु महायुतीने त्या मागणीकडे दुर्लक्ष करत नमिता मुंदडा यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे रिपाई सुद्धा आक्रमक झाली असून महायुतीच्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवून देणार असा आक्रमक पवित्र घेतला आहे. त्यामुळे रिपाईच्या नेत्यांना विश्वासात घेऊन आपल्याकडे जनाधार वळवणे हे विद्यमान आमदारापुढील एक आव्हान असणार आहे.
           दरम्यान, महाविकास आघाडीची यादी अद्याप जाहीर झालेली नाही.मात्र केज विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक असलेले उमेदवार डॉ. अंजली घाडगे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, संगीता ठोंबरे, केजच्या नगराध्यक्ष सीता बनसोड यांच्यासह अनेक जण मनोज जरांगे पाटील यांना भेटून आलेले आहेत. आणि संगीता ठोंबरे यांनी तिकीट जरी नाही मिळाले तरी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर पृथ्वीराज साठे आणि अंजली घाडगे यांनी मात्र जर तरची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत जो उमेदवार बॉण्डवर लिहून देईल अशा उमेदवारालाच सहकार्य करायचे असे मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केल्याने याचा नेमका फायदा कुणाला होतो ? आणि फटका कुणाला बसतो ? हे निवडणुकी दरम्यान स्पष्ट होणारच आहे. परंतु यामध्ये महायुती सरकारने आरक्षणाची मागणी मान्य न केल्यामुळे महायुतीच्या उमेदवारालाच मोठा फटका बसण्याची शक्यता मतदार बोलून दाखवत आहेत.
शेअर करा
Exit mobile version