केज दि. २४ – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हे बीड येथे रुजू झाल्यानंतर सरकारी रुग्णालयाचे बिघडलेले आरोग्य सुधारण्याची मोहीम हाती घेतली आहे. नियमित ते विविध उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयाला भेटी देऊन त्या ठिकाणी सुरू असलेल्या सेवा सुविधांचा आढावा घेत आहेत.आणि कमतरता पूर्ण करण्यासाठी सूचना देत आहेत.
डॉ. अशोक थोरात केज जेथे असताना त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेमध्ये सुरळीतपणा आणलेला होता. मात्र पुन्हा ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीडला रुजू झाले आणि त्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे झाली. परंतु मागच्या तीन-चार वर्षांमध्ये बीड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांच्या तक्रारी वाढल्या असून रेफर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. तसेच रुग्णांना बाहेरून औषधी आणाव्या लागतात अशाही तक्रारी दिसून येत आहेत. काही ठिकाणी सोनोग्राफी मशीन आहेत मात्र रेडिओलॉजिस्ट नसल्याने त्या धुळखात पडून आहेत. त्यामुळे डॉक्टर अशोक थोरात यांनी बीडला रुजू झाल्यानंतर या सर्व गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आणि याचाच एक भाग म्हणून मंगळवारी केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनी भेट दिली आणि पत्रकारांशी संवादही साधला. यादरम्यान पत्रकारांनी केजच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक कमतरता असल्याचे डॉ. अशोक थोरात यांना सांगितल्यानंतर त्यांनी सर्व बाबींची नोंद करून लवकरात लवकर ज्या सेवा रुग्णांना मिळत नाहीत त्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.