केज दि. २४ – अखेर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर झाली आणि यामध्ये अनेक विश्लेषकांच्या दांड्या गुल झाल्या. केज विधानसभा मतदारसंघात राशप कडून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी मिळाल्याने थोरल्या पवारांच्या परीक्षेत ते पास झाले आहेत. मात्र आता चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात मोठी चर्चा ही केज मतदार संघाची होती. पृथ्वीराज साठे यांना राशप ने उमेदवारी देऊन रणांगणात उतरले आहे. केज विधानसभा मतदारसंघांमध्ये पृथ्वीराज साठे आणि डॉक्टर अंजली घाडगे यांच्यामध्ये तिकिटासाठी रस्सीखेच होती. मागच्या कित्येक वर्षांपासून पृथ्वीराज साठे हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहेत तर डॉक्टर अंजली घाडगे यांनी मागच्या महिन्यात राशपमध्ये प्रवेश करून आपले अस्तित्व निर्माण केले होते. आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मतदार संघही पिंजून काढला होता. परंतु तिकीट वाटपामध्ये जुन्या आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याचा विचार झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, पृथ्वीराज साठे यांना तिकीट मिळाल्याने अपेक्षा ठेवून असलेल्या डॉ. अंजली घाडगे आणि माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्यामुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रा.संगीता ठोंबरे यांनी तिकीट नाही मिळाले तरी अपक्ष लढण्याची घोषणा केलेली आहे.मात्र अंजली घाडगे यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर चित्र वेगळेच असणार आहे. मात्र अद्याप घाडगे यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत.