केज दि.२९ – राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे केज विधानसभेचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी मंगळवार दिनांक 30 रोजी अतिशय साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी विद्यमान आमदारांच्या निष्क्रियतेवर भाष्य केले.
माजी आमदार पृथ्वीराज साठे हे मागच्या अनेक वर्षांपासून केज विधानसभा मतदारसंघांमध्ये सक्रिय आहेत. अत्यंत साधी राहणी आणि विनम्रता हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत महाविकास आघाडी कडून त्यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी अनेक इच्छुक उमेदवारांनी राशपमध्ये प्रवेश केला आणि तिकीट मागणीच्या लाईन मध्ये होते. परंतु पृथ्वीराज साठे यांची एकनिष्ठता कामाला आली आणि शरद पवारांनी त्यांचे नाव जाहीर केले. पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी अगदी अल्पकाळात केज विधानसभेचे आमदार म्हणून अनेक विकास कामांना गती दिलेली आहे. मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावात त्यांना मानणारा मोठा वर्ग असून पृथ्वीराज साठे सर्व परिचित आहेत.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी डॉक्टर अंजली घाडगे यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी साठे यांनी केज मतदार संघातील जनता ही माझ्या पाठीशी असून नक्कीच मला भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच विद्यमान आमदार फक्त विकास केल्याच्या गप्पा मारत असून त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला असा प्रहारही त्यांनी विद्यमान आमदार रांवर केला. तर डॉ.अंजली घाडगे यांनी मला पक्षाचा आदेश मान्य असून मी साठे साहेबांसोबत असल्याची भावना बोलून दाखवली.