केज दि.३१ – शहराचा असो वा खेड्याचा विकास हा त्या त्या ठिकाणच्या मूलभूत सोयी सुविधांवर मोजल्या जातो. मूलभूत सुविधाच जर कोसो दूर असतील तर बाकी कितीही गोष्टी करा त्याची म्हणावी एवढी दखल घेतल्या जात नाही. आणि याच मूलभूत सोयी सुविधांवर विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी लक्ष दिल्याने होत असलेली निवडणूक त्यांना सोपी झाली आहे.
केज शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार व मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची झालेली दुरावस्था व यासाठी व्यापारी बांधवांकडून होणारी मागणी लक्षात घेत आ. नमिता मुंदडा यांनी शासनदरबारी पाठपुरावा करत शहराच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा रस्त्यांसाठी नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून शहात्तर कोटींचा निधी आणला. या निधीतून होत असलेली रस्त्याची कामे शहराच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरल्या आहेत.
केज शहरातील लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी वर्षभरापूर्वी तत्कालीन मा. खा. प्रीतम मुंडे यांच्या मुख्य उपस्थितीत व्यापारी, वकील व शहरातील प्रतिष्ठितांचा एक व्यापक संवाद मेळावा घेतला होता. त्यात सर्वांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या होत्या. यात उपस्थित व्यापारी बांधवानी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठ, कानडी रोड यांची दुरावस्था झाल्यामुळे हे रस्ते नव्याने तयार करण्याची मागणी केली. आणि त्यावर आ. मुंदडांनी सकारात्मक प्रतिसाद देत वर्षभरात हे रस्ते करू असा शब्द दिला होता. सर्वांच्या मागण्यांसंदर्भात आ. मुंदडांनी शासनदरबारी प्रयत्न करत नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून शहात्तर कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला. या प्राप्त निधीतून शहरातील उमरी रोड, मंगळवार पेठ, नगरपंचायत ते पोस्ट ऑफिस, नगरपंचायत ते टिपुसुल्तान चौक ही कामे कांही पूर्ण झाली आहेत तर कानडी रोडचे काम प्रगतीपथावर आहे. पूर्ण झालेल्या रस्त्यांमुळे दळणवळण सुकर झाले आहे.
दरम्यान, मागच्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडलेला उमरी रोडला, मंगळवार पेठ आणि रोजा मोहल्ल्यातील रस्ता पूर्ण झाल्याने सदरील भागातील रहिवाशी समाधानी असून आ. मुंडडांचे आभारही व्यक्त करत आहेत.