केज दि.३ – मागच्या काही दिवसांपासून कोणत्या जागा लढायच्या आणि कुणाला पाठिंबा द्यायचा ? यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि इच्छुक उमेदवारांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र अखेर याबाबत काही निर्णय घेण्यात आले असून केज विधानसभा राखीव मतदारसंघ लढण्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कुठे उभे करायचे आणि राखीव मतदारसंघांमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा ? याबाबत मनोज जरांगे पाटील यांचे विचार मंथन सुरू होते. आणि आता उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने आज आंतरवाली सराटी येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी केज विधानसभा मतदारसंघ लढवण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान केज विधानसभा मतदारसंघांमध्ये जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची अनेक वेळा भेट घेतलेली असून आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी विनंती केलेली आहे. मात्र केज विधानसभा मतदारसंघ लढवण्याचे निश्चित जरी केलेले असले तरी केज मधून जरांगे पाटील नेमका कोण उमेदवार देतात हे सायंकाळपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाठिंबा मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेले केज विधानसभा मतदारसंघातील सर्वच इच्छुक उमेदवार अंतरवाली सराटी येथे तळ ठोकून आहेत.