केज दि.६ – विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्राध्यापक संगीता ठोंबरे यांनी सर्व ताकदीनिशी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि विधानसभा उमेदवार पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिला. आणि याचेच बक्षीस म्हणून संगीता ठोंबरे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावली असून आता त्या राशपच्या सक्रिय सदस्य झाल्या आहेत.
माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघासाठी सुरुवातीला राशप कडून उमेदवारीची मागणी केली होती मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर ठोंबरे ह्या मनोज जरांगे पाटील यांचा जर पाठिंबा मिळाला तर निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत होत्या. मात्र जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आणि कित्येक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या संगीता ठोंबरे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि उमेदवारी अर्ज मागे घेताना राशपचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना यांना जाहीर पाठिंबा दिला.
दरम्यान चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि संगीता ठोंबरे यांची चोवीस तासांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. राशपचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना निवडणूक सोपी व्हावी यासाठी उमेदवारी अर्ज तर मागे घेतला नाही ना ? अशा चर्चा झडत असतानाच संगीता ठोंबरे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांना बक्षीस म्हणून दिली की काय ? असे बोलल्या जात आहे.