केज दि.१३ – भाजपच्या विद्यमान आ.नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी अक्षय मुंदडा यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांवर तोफ डागली.
यावेळी पुढे बोलताना अक्षय मुंदडा म्हणाले की, आम्ही कायम जनतेच्या संपर्कात राहून सुख दुःखात सहभागी होतो याचेही विरोधकांच्या पोटात दुखत आहे. ज्यांना आम्हीच मोठे केले तेच आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. मतदार संघातील विकास कामांसाठी नमिता मुंदडा यांनी कोट्यवधींचा निधी आणला आणि कामेही केली. कोणती कामे केली ती आम्ही दाखवू शकतो. ज्यांनी विकास कामांच्या नावावर निधी आणला आणि स्वतः ची घरे भरली त्यांनी एकही रस्ता पूर्ण केलेला दाखवावा असे आव्हानही दिले. स्व.विमलताईंच्या दुरदृष्टीमुळे उभारण्यात आलेल्या लोखंडी सावर गावच्या दवाखाण्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले याचीही आठवण करून दिली. तसेच कोरोना काळात लोखंडी सावरगावचे हॉस्पिटल असल्यामुळे कुठे मंडप टाकून उपचार करण्याची वेळ आली नाही. आता काहीजण नाही नाही ते आरोप करत आहेत परंतु आम्ही जर तोंड उघडायला सुरुवात केली तर तुम्हाला मतदार संघात फिरणे मुश्किल होईल असा इशाराही दिला. ज्यांना शाळा आम्हीच दिल्या, ज्यांची भांडणं आम्ही मिटवले तेच आज आमच्यावर टिका करत आहेत. मात्र जिथून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली याचे त्यांनी भान ठेवून बोलावे असेही ते म्हणाले. माझ्या आईवडिलांनी माझ्यापेक्षा ज्यांच्यावर जास्त प्रेम केले तेच आज उलटले असून बेछूट आरोप करत सुटले आहेत अशा स्वार्थी आणि संधीसाधू लोकांना जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही व्यक्त केला.
दरम्यान, कुणी काहीही बोलले तरी आम्ही फक्त जनतेशी बांधील आहोत. आणि जनताच आम्हाला यापुढेही मतदारसंघात नमिता मुंदडा यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले.