केज दि.१५ – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे पाच दिवस उरलेले आहेत. विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराचा आणि जाहीर सभांचा धडाका उडत आहे. महायुती असेल किंवा महाअघाडी असेल त्यांनी राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय नेत्यांच्या सभा घेतल्या. त्यातच मनसेच्या उमेदवारासाठी ही राज ठाकरेंची सभा होणार म्हणून भोंगे फिरले मात्र ऐनवेळी राज साहेबांची सभा रद्द झाल्याने जिल्हाध्यक्षाचे मतदारसंघांमध्ये किती वजन आहे हे यावरून स्पष्ट झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस केज विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेचा उमेदवार दिला. त्याचवेळी राज ठाकरे कुटुंबियांच्या आणि भाजपाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या नातेसंबंधांची चर्चा सुरू झाली होती. तरीही मनसेने मतदारसंघांमध्ये प्रचाराचा जोर लावला होता. मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांनी अगोदर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी उंबरठे झिजवले होते. मात्र ज्यावेळेस इकडे आपला काही वेळ लागत नाही असे लक्षात आल्यानंतर ते जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या गळाला लागले आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी रमेश गालफाडे यांना राज ठाकरे यांच्याकडे नेऊन तिकिटाची मागणी केली.एवढेच नव्हे तर आम्ही मनसेचा उमेदवार निवडून आणून अशी वल्गनाही केली. त्यानंतर तिकीट जाहीर झाले आणि मोठ्या दिमाखात उमेदवाराचे विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वागतही करण्यात आले, मोठा गाजावाजा करून प्रचाराला सुरुवातही झाली. खेड्यापाड्यामध्ये रेल्वे इंजिन पोहोचवण्याचे काम उमेदवाराचे कार्यकर्ते करू लागले आणि त्यातच राज साहेबांची सभा केजला होणार असे सांगणारे भोंगे विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरू लागले. तारीखही ठरली, हेलीपॅड ही तयार झाले आणि भव्य मंडप उभारण्यात आला. मात्र सभेच्या दिवशी पहाट पासूनच राज ठाकरे येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली. मात्र उमेदवाराने, पदाधिकाऱ्यांनी अगदी दोन वाजेपर्यंत मतदारांना संभ्रमात ठेवले आणि त्या ठिकाणी स्वतः जाऊन जे काही मुठभर लोक आले होते त्यांच्यासमोर भाषण ठोकले. आणि राज ठाकरे यांचस संदेशही भ्रमणध्वनी वरून ऐकवला. मात्र यामध्ये सर्वात घोर निराशा मतदाराची झाली आणि उमेदवार ही आता वाऱ्यावर सोडल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागत आहे. आणि एवढेच नव्हे तर उमेदवार तोंडघशी पडल्याने जिल्हाध्यक्षाकडे बोट दाखवल्या जात आहे.
दरम्यान, एखाद्या पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षातील प्रमुख नेते आपल्या जिल्ह्यात आणायचे असतील तर उमेदवारापेक्षा त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचे वजन असायला हवे. मात्र केज विधानसभेमध्ये मनसेची म्हणावी तेवढी संघटनात्मक बांधणी झालेली नाही. आणि त्यामुळेच की काय जिल्हाध्यक्षाचे वजनही राहिलेले दिसत नाही. म्हणूनच राज ठाकरेंनी या सभेकडे पाठ फिरवली की काय ? अशी चर्चा सुरू झाली असून हेलिकॉप्टर उपलब्ध झाले नाही हे कारण विधानसभा मतदारसंघातील जनतेला तेवढे पचलेले नाही. मात्र यात उमेदवाराची गोची झाली आहे.