केज दि.१५ – विधानसभा निवडणुकीचे अवघे पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकाल आहे. मात्र या दरम्यान आरोप आणि प्रत्यारोपांच्या फेरी जशा झडत आहेत तसेच काही संभ्रमात टाकणारे आणि काही पक्षांना भुवाया उंचावया लावणारे वक्तव्यही काही प्रमुख नेत्यांकडून येत असल्याने निकालानंतर येणारे सरकार नेमकं कोणत्या पक्षाचे येईल आणि कोणती आघाडी होईल हे सांगणे सध्या तरी कठीण झालेले आहे.
”मी भाजपाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की, सिल्लोडला लागलेला कलंक धुवून काढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, ठीक आहे तुमच्यात आणि आमच्यात थोडेफार मतभेद असतील, मात्र कुणी बोलायला आलं तर मी बोलायलाही तयार आहे” असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने अन्य पक्षप्रमुखांच्या तसेच राज्यातील जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारणामध्ये कुणीच कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो हे अधोरेखित झालेले आहे. कोण कधी कुणाबरोबर युती करेल आणि कोण कोणत्या आघाडीमध्ये जाईल ? याचा विचार विश्लेषकच काय तर मतदार ही करू शकत नाहीत. त्यामुळे सिल्लोड येथे जाहीर सभेत बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात हे जाहीर वक्तव्य केल्याने अनेक जण संभ्रमात पडले आहेत. मागच्या कित्येक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात असणारे पक्ष एकमेकांना अगदी खालच्या पातळीवर जाऊन डीवाचणारे नेते आणि पूर्णपणे वेगवेगळी विचारधारा असलेले पक्षही एकत्र येऊ शकतात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून भाजपा आणि आणि शिवसेनेची युती होती. मात्र मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात मतभेद झाले आणि दोघांनी वेगवेगळा मार्ग निवडला. मात्र पारंपारिक शत्रूही एकत्र येऊ शकतात तर काही काळ मतभेद झालेले दोन पक्ष एकत्र का येऊ शकत नाहीत ? असा कयास लावणं सुरू झालं आहे.
दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आपलं सरकार आणण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. एकमेकांवर नाही नाही त्या शब्दात आरोप करत आहेत. काल्पनिक आणि जे कधी घडलं नाही अशाही गोष्टी भर सभेत बोलत आहेत. त्यामुळे दोघांनाही आपलं सरकार बसवण्याची किती तीव्रता आहे हे यावरून लक्षात येतं. मात्र महायुतीमध्ये असलेले पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये असलेले पक्ष नेमकं यांचं सरकार येईल की ? महायुती आणि महाविकास आघाडी मधील ही काही घटक पक्ष इकडे तिकडे जाऊन सरकार बनवतील असे अंदाज नेत्यांच्या वक्तव्यावरून व्यक्त होत आहेत. आणि या अंदाजाला आणि संशयाला वावही आहे कारण कुणी कुणाबरोबरही जाऊ शकत याचा अनुभव अवघ्या महाराष्ट्राने घेतलेला आहे.