https://strawpoll.com/wAg3Qw0E2y8
(Link वर क्लिक करून आपले मत नोंदवा)
केज दि.२१ – राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. यामध्ये काही ठिकाणी तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. मात्र या निवडणुकीतही मतदानाचा टक्का घसरल्याने आणि मतदार मतदानापासून दूर जाऊ लागल्याने लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत हानिकारक होऊ लागलेले आहे. राज्यात २८८ जागांसाठी दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. काही ठिकाणी उमेदवार एकमेकांना भिडले तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा गदारोळ दिसून आला. मात्र त्या त्या ठिकाणी घडलेल्या घटनांवर प्रशासनाने तात्काळ काबू मिळवल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. केज विधानसभा मतदारसंघातील विडा गावातील प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले.
केज विधानसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर विधानसभा मतदारसंघांमध्ये ३८७२२१ मतदारांची नोंद आहे. परंतु यामध्ये केवळ २४५७९९ मतदारांनीच (६३.४८%) आपला मतदानाचा हक्क बजावला. तर एक लाख १४१४२२ मतदार लोकशाहीच्या उत्सवापासून चार हात लांब राहिले. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवल्या जातात. मतदान हा लोकशाहीने दिलेला आपल्याला अधिकार आहे आणि तो आपण बजावला पाहिजे, विकासाची दृष्टी असणाऱ्या उमेदवाराला निवडून दिले पाहिजे असे वारंवार सांगितले जाते. मात्र या सर्व गोष्टी केवळ ऐकून घेतल्या जातात आणि मतदानाच्या दिवशी असलेली सुट्टी ही वेगळ्याच कामासाठी घालवली जाते हे या विधानसभा निवडणुकीतही दिसून आले.
दरम्यान अशा प्रकारे सुमारे ४०% मतदार जर या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवत नसतील, आपले मत मांडत नसतील तर लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी निवडायचा कुणी ? आणि त्याला जाब विचारायचा कुणी हे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागलेले आहेत. ज्यांनी मतदान केले नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार आणि शहरी भागातील सुज्ञ मतदारांनाचा समावेश आहे. तर दुसरीकडे यावेळी मतदारांमध्ये म्हणावा तेवढा उत्साहही दिसून येत नव्हता. त्यामुळे या निरुत्साहाच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे.