(वरील लिंकवर क्लिक करून नोंदवा आपला अंदाज…..कोण मारणार केज विधानसभेत बाजी…?)
केज दि.२२ – केज विधानसभा मतदार संघाच्या (राखीव) निवडणुकीसाठी बुधवारी ६३.४८ टक्के मतदान झाले आहे. शनिवारी (दि. २३) सकाळी ८
वाजता तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात मतमोजणी केली जाणार आहे. ४२० मतदान केंद्रावरील मतदानाची १४ टेबलवर व ३० फेऱ्यात मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी दिली.
केज विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार आ. नमिता मुंदडा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माजी आ. पृथ्वीराज साठे, मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांच्यासह २५ उमेदवारांच्या भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ४२० मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ३ लाख ८७ हजार २२१ मतदारांपैकी २ लाख ४५ हजार ७९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ६३.४८ टक्के मतदान झाले आहे. त्यात १ लाख ३० हजार ८५४ पुरुष, १ लाख १४ हजार ९४३ स्त्री व २ तृतीयपंथी मतदारांचे मतदान झाले आहे.
येथील तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात मतमोजणी शनिवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू केली जाणार आहे. १४ टेबलवर मतमोजणी केली जाणार असून त्यासाठी प्रत्येक टेबलवर तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणी ही ३० फेऱ्यात होणार आहे. तर पोस्टल मतमोजणी ९ टेबलवर व सैनिकांची मतमोजणी ३ टेबलवर होणार आहे. प्रत्येक टेबलवर उमेदवारांचा प्रतिनिधी राहणार असून उमेदवार व अधिकाऱ्यांची स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. मतमोजणीस्थळी सीआरएफ जवान व पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी दिली.
दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विलास तरंगे, सहाय्यक निर्णय अधिकारी राकेश गिड्डे, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, बीडीओ समृद्धी दिवाने, नायब तहसीलदार आशा वाघ, सचिन देशपांडे, सुजाता रामटेके हे मदत करणार आहेत.