केज दि.१२ – शहरातील उमरी रोडवर असलेल्या एका मोटार रिवायडींग च्या दुकानात चोरट्यांनी चोरी करत हातावर पोट असणाऱ्या एका कष्टकऱ्याचे सुमारे अडीच लाखाचे साहित्य घेऊन पोबारा केला आहे.
तालुक्यातील शिरपूरा येथील सतीश महादेव घुले यांचे केज शहरातील उमरी रोडवर सागर मोटार रिवायडींग चे दुकान आहे. घुले हे नेहमीप्रमाणे दि.१० डिसेंबर रोजी सायंकाळी दुकान बंद करून गावाकडे गेले होते. मात्र ते जेव्हा दिनांक १२ डिसेंबर रोजी परत आले आणि दुकान उघडले, त्यावेळेस दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानांमध्ये ठेवलेले कॉपर वायरचे बंडल, गल्ल्या मधील रोख तीन हजार यासह अन्य काही साहित्य मिळून दोन लाख ४० हजार रुपयाचे साहित्य चोरट्याने चोरून नेले. सदरील प्रकरणी सतीश घुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.