केज दि.१९ – शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अस्तित्वात असलेली नगरपंचायत नागरिकांना सुविधा देण्यात कमी पडत आहे. विकासाचे प्रश्न मिळणाऱ्या तोकड्या निधीमुळे प्रलंबित आहेत, म्हणून केजला नगरपालिकेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी विधिमंडळात केली आहे
2009 साली केजच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले. त्यावेळी केजच्या विकासाला चालना मिळेल असा अंदाज होता. परंतु तसे होत नसल्यामुळे शहराच्या विकासाची अनेक प्रश्न प्रलंबित राहिली आहेत. त्यातच आता शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे त्यामुळे निधीची कमतरता दिसू लागली आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यातही नगरपंचायत अपुरी पडत आहे. तर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हीच बाब लक्षात घेत आ. नमिता मुंदडा यांनी शहराच्या विकासाची दारे खुली व्हावेत यासाठी विधिमंडळात केजला नगरपालिकेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, केजला नगरपंचायत चा दर्जा मिळावा यासाठी शहरवासीय मोठ्या प्रमाणावर मागणी करत होते. या मागणीच्या अनुषंगाने 2009 मध्ये स्व. विमलताई मुंदडा यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि सर्वंकष प्रयत्नातून केजला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. आणि आता नमिता मुंदडा यांनी शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत.