Site icon सक्रिय न्यूज

केज बसस्थानकातून पुन्हा दागिन्यांची चोरी…..!

केज बसस्थानकातून पुन्हा दागिन्यांची चोरी…..!

केज दि.२३ – पुन्हा एकदा केज बस स्थानकामधून प्रवासाला निघालेल्या महिलेच्या पर्समधील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. यामध्ये सदरील महिलेचे सुमारे पाच लाखाचे दागिने केज बस स्थानकामधून चोरीस गेले आहेत.             शहरातील मकरंद घुले व सुरेखा सुभाष घोळवे -घुले  हे सोमवारी (दि.२३) पुण्याला जाण्यासाठी केज बस स्थानकामध्ये आले होते. त्यादरम्यान परळी – पुणे गाडी आली असता त्यामध्ये ते बसले. मात्र लागलीच सदरील महिलेच्या दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले. सदरील घटनेची माहिती वाहक आणि चालकांना दिल्यानंतर परळी – पुणे गाडी ही थेट केज पोलीस स्थानकामध्ये आणली आणि त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि सुरेखा सुभाष घोळवे यांची तक्रार नोंदवून घेतली आणि गाडी पुण्याकडे मार्गस्थ झाली.

         मागच्या कित्येक वर्षांपासून दर महिना किंवा पंधरा दिवसाला महिलांचे दागिने चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र याचा कायम बंदोबस्त आणखीही झालेला नाही. बस मध्ये महिला प्रवाशी चढताना नजर ठेवून दागिने आणि पैसे चोरी करणाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याचे यामधून स्पष्ट होते. मात्र अद्यापही ठोस कारवाई अशी काही झालेली नाही. बस स्थानकात सीसीटीव्ही आहेत मात्र अद्याप पर्यंत तरी त्या सीसीटीव्हीचा फायदा एखाद्या चोरीचा छडा लावण्यासाठी झालेला दिसत नाही. एवढेच नव्हे तर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने बस स्थानकामध्ये एक पोलीस चौकीही उभारण्यात आली. मात्र ती कायमस्वरूपी बंद असल्याने चोरांना कसल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही. जोपर्यंत चोरटे जेरबंद होत नाहीत तोपर्यंत प्रवाशी कायम अशा घटनांना बळी पडणार आहेत. त्यामुळे पीआय वैभव पाटील यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शेअर करा
Exit mobile version