Site icon सक्रिय न्यूज

ट्रकमधून तुरीचे कट्टे लंपास तर पाणबुडी मोटारही गेली चोरीला…! 

ट्रकमधून तुरीचे कट्टे लंपास तर पाणबुडी मोटारही गेली चोरीला…! 
केज दि.१४ – दोघा चोरट्यांनी चालत्या ट्रकवर चढून ट्रकमधील ३८ हजार रुपये किंमतीचे तुरीचे १० कट्टे लांबविल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील टोलनाक्याजवळ घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
    सोलापूर जिल्ह्यातील पोफळी (ता. मोहळ) येथील ट्रक चालक लक्ष्मण किसन यजगर हे १२ जानेवारी रोजी घोडेगाव (ता. नेवासा जि. अहिल्यानगर) येथील सरोज ट्रेडींग कंपनी येथून तुरीने भरलेले ५० किलोचे सुतळीचे ५०० कट्टे ट्रकमध्ये (एम. एच.०४ जी. सी. ९०११) भरून लोहारा (ता. उदगीर जि. लातूर) येथील विनायक ऍग्रो कंपनीकडे पोहोच करण्यासाठी निघाले होते. मांजरसुंबा मार्गे केजकडे येत असताना १३ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास या रस्त्यावरील टोलनाक्याच्या पुढे आले होते. चालत्या ट्रकवर दोन चोरटे चढून ताडपत्री फाडून तुरीचे कट्टे चोरत असल्याचे पाहून पाठीमागून आलेल्या ट्रक चालकाने त्यांनी माहिती दिली. त्यांनी पाहणी केली असता ट्रकमधील ३८ हजार रुपये किंमतीचे तुरीचे १० कट्टे लांबविल्याचे दिसून आले. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे हे करीत आहेत.
           तर केज तालुक्यातील कानडी माळी येथील शेतकरी रमेश सुखदेव म्हस्के यांची शिवारात साडेसात एकर शेती असून त्यांनी गावातील नदीत पाणबुडी मोटार टाकून शेतीला पाणी द्यायचे. ११ जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्याने नदीतून २२ हजार रुपये किंमतीची ५ एचपीची पाणबुडी मोटार पाईप कापून चोरून नेली. रमेश म्हस्के यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version