बीड दि.४ – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये नैतिकता बाळगून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागच्या दोन महिन्यांपासून सर्वच स्तरातून मागणी होत होती. मात्र आता संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो प्रसार माध्यमांवर वायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड दबाव वाढल्याने अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन तीन महिने उलटत आहेत. यामध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मीक कराड यांच्यासह हत्या प्रकरणातील सुधीर सांगळे वगळता सर्व आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आणि शनिवारी या प्रकरणाचे चार्जसीट न्यायालयात दाखल केले. मात्र दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर यामध्ये संतोष देशमुख यांची प्रत्यक्ष हत्या करताना कसा क्रूरतेचा कळस गाठलेला होता याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि हे फोटो पाहून संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. आणि याचाच परिपाक म्हणून अखेर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.
मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा…..!

दरम्यान सदरील फोटो व्हयरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला, याचे पडसाद ठिकठिकाणी उमटू लागले, बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. आणि विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त केल्या गेला. आणि याच दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत सरकारची बुज राखण्याचा प्रयत्न केला आहे.