Site icon सक्रिय न्यूज

नायब तहसीलदारांच्या दालनातच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न !

नायब तहसीलदारांच्या दालनातच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न !
केज दि.७ – पती पासून विभक्त राहत असलेल्या महिलेला तिच्या माहेरच्या कडून मिळालेली जमीन तिच्या पतीने परस्पर बनावट दान-पत्रा आधारे दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या नावावर केली. तो बनावट फेर रद्द करावा, या मागणीसाठी एक परित्यक्ता महिलेने नायब तहसीलदार यांच्या दालनातच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार लक्षात येताच कांही अनर्थ होण्या अगोदरच तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला रोखले.
          सन १९९० मध्ये दीपा देशमुख यांचा विवाह वरपगाव ता. केज येथील येथील रविंद्र श्रीहरी भोसले यांच्या सोबत झाला होता. विवाहा नंतर त्यांना कोमल नावाची मुलगी झाली. तसेच दिपा भानासुर देशमुख यांची आई रुक्मीण देशमुख यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मुलगी दिपा देशमुख हिच्या नावाने केली होती. परंतु काही दिवसा नंतर रवींद्र भोसले याने पहिली पत्नी असताना दुसऱ्या एका महिलेशी लग्न केले. तिच्या पासुन रवींद्र भोसले यास दोन मुली व एक मुलगा असे अपत्य आहेत. त्यामुळे दिपा देशमुख ही तिची मुलगी कोमल देशमुख हिला घेवून नवरा रवींद्र भोसले यांच्या पासून विभक्त राहत आहे.
           दरम्यान रवींद्र भोसले याने पहिली पत्नी दिपा हिच्या नावाने असलेली गट नंबर ५६/१ व गट नंबर ५७/१ मधील ८१ आर जमीन ही रवींद्र भोसले यांनी बनावट दान-पत्रा आधारे आणि तलाठी मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून एका बाँड आधारे दुसऱ्या पत्नी पासून झालेल्या मुलगा उत्तरेश्र्वर भोसले याच्या नावाने महसुली दस्तावेज करून घेतला.
सदर रवींद्र भोसले यांनी तत्कालीन महसुली अधिकारी यांच्याशी संगनमत करून उत्तरेश्र्वर भोसले यांच्या नावे केलेला फेर रद्द करण्याच्या मागणीसाठी दिपा देशमुख या अनेक दिवसा पासून तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात खेटे घालीत आहेत. त्यानुसार दि. ६ मार्च रोजी सदर फेर रद्द करण्याच्या संदर्भात केज तहसील कार्यालयात सुनावणी झाल्या नंतर दिपा देशमुख यांनी हा फेर रद्द का झाला नाही ? म्हणून नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या दालनामध्ये दुपारी ४:०० वा. च्या सुमारास सोबत एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये आणलेले पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तहसील कार्यालयात असलेल्या महिला नायब तहसीलदार आशा वाघ आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून त्या महिलेला आत्मदहन करण्या पासून रोखले.
त्या नंतर केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक सविता निरडे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी दिपा देशमुख या महिलेला आत्मदहन करण्या पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
 तहसीलरांनी काढले आदेश…..!
 दिपा भानासूर देशमुख यांनी बनावट फेर रद्द करण्याच्या मागणीसाठी अंगावर पेट्रोल ओतून घेतल्या नंतर तहसीलदार राकेश गिड्डे यांनी तातडीने तलाठी व मंडळ अधिकारी यांना मौजे वरपगांव ता. केज येथील जमीन स. नं. ५६/१ आणि  मधील क्षेत्र ०.२६ हे आर व स नं ५७/१ मधील क्षेत्र ०१ हे ७४ आर. मध्ये फेरफार क्रमांक ८०५ रदद करण्यात येतो. असा आदेश मा. उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांनी दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी न्यायनिर्णय पारीत केलेला आहे. सदरील आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी व स.नं. ५६/१ व ५७/१ ची ७/१२ व फेरफार या कार्यालयास आजच सादर करावा असे आदेश दिले आहेत. तसेच या कामी हयगय अथवा विलंब टाळावा विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील अशी तंबी देखील दिली आहे.
शेअर करा
Exit mobile version