केजचे कोव्हीड 19 तपासणी व उपचार केंद्र बंद करू नका…केज विकास संघर्ष समिती
डी डी बनसोडे
केज दि.9 – केज शहर व तालुक्यातील जनतेसाठी असलेले पिसेगाव येथील कोव्हीड 19 अर्थात कोरोना विषाणू लागण तपासणी व उपचार केंद्र बंद करू नये अशी मागणी केज विकास संघर्ष समितीने तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड 19 विषाणूचा संसर्ग व रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्गित रुग्ण तपासणी व उपचार केंद्र सध्या केज जवळ पिसेगाव येथे कार्यान्वित आहे. हे केंद्र बंद करून केज शहर व तालुक्यातील रुग्णांणा तपासणी व उपचारासाठी आंबेजोगाई तालुक्यात लोखंडीसावरगाव नजीक नव्याने सुरू केलेल्या रुग्णालयात पाठवण्याची तयारी जिल्हा आरोग्य विभागाने केली असल्याची माहिती आहे. असे झाल्यास केज शहर व तालुक्यातील रुग्णांणा स्वॅब देण्यापासून इतर प्राथमिक तपासणीसाठी एवढ्या दूर जाणे व येणे शक्य होणार नाही. याशिवाय अनेक नागरिक दूर अंतर असल्याने आपली तपासणी करून घेण्यास टाळाटाळ करू शकतील. यासाठी प्रशासनाने कोव्हीड 19 संसर्गाची प्राथमिक तपासणी व हलकी लक्षणे असणाऱ्या रुग्णावर पिसेगाव केंद्रावरच उपचार करावेत व केवळ गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना लोखंडीसावरगाव येथे पाठवावे अशी मागणी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले, पत्रकार विनोद शिंदे, नासेर मुंडे इत्यादींनी केली आहे. जर हे केंद्र बंद केले अथवा इतरत्र हलवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.