Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये मजुराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

केजमध्ये मजुराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट
(प्रतिकात्मक फोटो)
बीड दि.10 -एका 40 वर्षीय मजुराने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज शहरातील धारूर रस्त्यावरील भवानी माळ परिसरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या मजुराने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. 
     केज शहरातील भवानी माळ परिसरात वास्तव्यास असलेले अनंत विठ्ठल शिनगारे ( वय 40 ) हे मजुरी करून कुटुंबियांची उपजीविका भागवित होते. गुरुवारी दुपारी घरी कोणी नसताना अनंत शिनगारे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार महादेव गुजर, पोलीस नाईक मंगेश भोले, पोलीस नाईक धनपाल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अनंत शिनगारे यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नसून घरातील कर्ता गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
—————————————————-
केजमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा विना मास्क चालकांकडून ३४ हजाराचा दंड वसूल 
कोरोना आजाराचा प्रार्दुभाव वाढला असताना ही केज शहरात अनेक दुचाकी चालक हे विना मास्कचे फिरत आहेत. बुधवारी विना मास्कचे फिरणाऱ्या १७१ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करून ही दुसऱ्या दिवशी गुरुवारी आणखी १६४ दुचाकी चालक विना मास्कचे फिरताना तहसीलदार आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यावर दंडाची कारवाई करीत तब्बल ३४ हजार रुपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
         केज शहरात आणि ग्रामीण भागात कोरोना आजाराची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाने काही नियम आणि अटी घालून लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी फिरताना व बाजारपेठेत खरेदी करताना सामाजिक अंतर ठेवण्याच्या आणि तोंडाला मास्क, रुमाल बंधनकारक केले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे. तर दुचाकीवरून फिरणारे अनेक जण हे तोंडाला मास्क अथवा रुमाल न बांधता फिरु लागले आहेत. दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना या आजाराचे गांभीर्य नसलेले नागरिक फिरताना खबरदारी घेत नसल्याने केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी तोंडाला मास्क न वापणाऱ्या नागरिकांवर पुन्हा दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
       बुधवारपासून तहसीलदार मेंडके आणि मुख्याधिकारी भोसले हे केज शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यावर थांबून विना मास्क दुचाकीवर फिरणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. बुधवारी एकाच दिवशी विना मास्क फिरणाऱ्या १७१ दुचाकी चालकांना दंड आकारून त्यांच्याकडून ३४ हजार ३०० रुपये दंडाची रक्कम वसूल केली. ही कारवाई करून ही दुसऱ्या अनेक दुचाकी चालक हे विना मास्कचे रस्त्यावर फिरत होते. गुरुवारी ही तहसीलदार मेंडके आणि मुख्याधिकारी भोसले यांनी रस्त्यावर थांबून विना मास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यात दुसऱ्या दिवशी ही १६४ दुचाकी चालक हे विना मास्क फिरताना त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांना दंड आकारून या १६४ जणांकडून ३४ हजार रुपये इतकी दंडाची रक्कम वसूल झाली आहे. नगरपंचायतीने दोन दिवसात विना मास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांकडून तब्बल ६८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शेअर करा
Exit mobile version