बीड दि. १६ – आगामी पाच वर्षात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीचे जिल्ह्याचे आरक्षण अखेर मंगळवारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता आपल्या गावचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गाला असणार हे स्पष्ट झाले असून त्यानुसार गावागावात आता नवीन समीकरणे जुळवायला सुरुवात होणार आहे.
बीड जिल्ह्यात आगामी पाच वर्षात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीची आरक्षण सोडत जिल्ह्यातील ११ तहसीलकार्यालयांमध्ये पार पडली. प्रत्येक तालुक्यासाठी सरपंचपदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षित जागांचे वाटप करण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), या तिन्ही प्रवर्गातील महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे सरपंचपदाची आरक्षण जाहीर करण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक गावात आगामी निवडणुकीनंतर सरपंच कोणत्या प्रवर्गाचा असणार हे चित्र स्पष्ट झाल्याने आतापासूनच गावातील पॅनलची समीकरणे जुळवायला सुरुवात होणार आहे. बीड जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींची आगामी पाच वर्षात तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

