बीड दि.12 – मागच्या चार महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्यासाठी अनेकदा बैठका, विचारविनिमय झाला. मात्र कोरोना च्या वाढत्या पार्श्वभूमीवर ते शक्य झालेले नाही. दरम्यान केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास साफ नकार दिला असून याबाबत आता दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत केंद्राने नुकतेच निर्देश दिले होते.परंतु महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या बघता २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडली. दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली.या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.
त्यामुळे तूर्त तरी शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे ही शाळा व पालकांची जबाबदारी असून काही ठिकाणी जरी अडचणी येत असल्या तरी त्यावर मात करून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे लागेल.