केज दि.12 – आमच्या शेतात शौचास कोणी केली ? या कारणावरुन केज तालुक्यातील बाभळगाव येथे पती-पत्नीस लोखंडी गज आणि काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि.२५ ऑगस्ट रोजी बाभळगाव ता. केज येथे फिर्यादी देवईबाई इंगोले यांना तिच्या जाऊबाई हिने त्यांच्या घरी जाऊन आमच्या शेतात संडास कोणी केली ? या कारणा वरुन शिवीगाळ केली. त्या नंतर देवईबाई हिचा पती नंदकुमार इंगोले यांने त्याच्या पत्नीला शिवीगाळ का केली? याचा जाब विचारला असता भारत इंगोले याने त्याला काठीने मारहाण केली. त्या नंतर दुसऱ्या दिवशी संकेत इंगोले, अशोक थोरात व महादेव कदम या तिघांनी नंदकुमार इंगोले यास तो घरी झोपलेला असताना काठी आणि लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून शेतात काम करीत असलेली फिर्यादी देवाईबाई घरी आली असता; तिला पण मारहाण करण्यात आली. मारहाणीत नंदकुमार इंगोले हे जखमी होऊन बेशुद्ध पडले होते. त्यामुळे त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्या नंतर दि. ११ सप्टेंबर रोजी देवईबाई इंगोले यांच्या फिर्यादी नुसार संकेत इंगोले, अशोक नवनाथ थोरात, महादेव कदम व डिगांभर इंगोले या चौघांच्या विरोधात केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३६०/२०२० भा.दं.वि. ३२६, ३२४, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करीत आहेत.
——————————————————-
केज तालुक्यात महिलेचा विनयभंग
केज तालुक्यातील होळ येथे एका तीस वर्षीय महिलेचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केल्याची घटना दि .१० सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे.
दि.१० सप्टेंबर, शुक्रवार रोजी राजाभाऊ बारकू राख वय (३५ वर्ष) हा एका तीस वर्षीय महिलेच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून तिच्या घरा समोर येऊन पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने वाईट हेतूने तिचा हाताला धरून विनयभंग केला. पीडित महिलेच्या तक्रारी नुसार राजाभाऊ राख यांच्या विरोधात केज पोलीस स्टेशनला दि.११ सप्टेंबर रोजी गु.र.नं. १८६/२०२० भा.दं.वि. ३५४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे व विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रामधन डोइफोडे हे पुढील तपास करीत आहेत.