मुंबई दि.२४ – गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार माजला आहे. ढगफुटीसदृश्य झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं आणि स्वप्नं वाहून गेली आहेत. गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदाच अशी भीषण परिस्थिती मराठवाड्याने अनुभवली आहे.
त्यातच आता हवामान विभागाने 24 ते 29 सप्टेंबर या कालावधीत पुन्हा एकदा राज्यावर मोठे संकट येणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला असून बंगालच्या उपसागरात तयार होणारी कमी दाबाची नवीन प्रणाली लवकरच डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात यंदाच्या नवरात्रीच्या सुरुवातीलाच अतिमुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे. येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता सर्वाधिक असेल. या काळात पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर आणि नांदेड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, काही ठिकाणी 150 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 28 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे आणि कोकणासह संपूर्ण राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. या अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांनीही आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

