बीड दि.१५ – सामाजिक न्याय व बंधुतेच्या मूल्यांवर आधारित कार्य करणाऱ्या दांपत्यांचा सन्मान करण्याची परंपरा महात्मा फुले युवा दलाने सुरू केली असून, या उपक्रमांतर्गत पहिला राज्यस्तरीय ‘फुले दांपत्य जीवन गौरव पुरस्कार’ इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे व संध्या बारगजे या दांपत्यास प्रदान करण्यात आला.
आनंदग्राम, पाली ता.बीड येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बारगजे दांपत्याची सन २०२४–२५ या वर्षासाठी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यावेळी सन्मानचिन्ह, फुले पगडी, साडी-चोळी व ₹११,०००/- रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सतीश शिंदे म्हणाले की, दत्ता बारगजे व संध्या बारगजे हे अत्यंत समर्पित भावनेने आनंदग्राममध्ये एचआयव्ही बाधित मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करत आहेत. समाजाकडून दुर्लक्षित व तिरस्कारास पात्र ठरलेल्या या मुलांच्या स्वाभिमान व स्वावलंबनासाठी बारगजे दांपत्य त्यागी वृत्तीने कार्य करत आहे.
तर सत्काराला उत्तर देताना दत्ता बारगजे म्हणाले की, “बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून आम्ही या कार्याची सुरुवात केली. समाजाच्या तळागाळातील घटकांसाठी काम करण्याचे मोठे आव्हान स्वीकारले आहे. आनंदग्राम उभे राहताना समाजाचा व अनेक दानशूर व्यक्तींचा मोलाचा सहभाग लाभला. तरीही अनेक अडचणी आहेत. अशा पुरस्कारांमुळे आमच्या कार्याला नवी ऊर्जा व दिशा मिळते. बुद्ध–शिव–फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारांवरच समाजात न्याय व बंधुता निर्माण होईल.” तर संध्या बारगजे म्हणाल्या, “हा पुरस्कार आमच्यासाठी अत्यंत मोलाचा असून तो कायम आमच्या हृदयात राहील. महापुरुषांनी सांगितलेल्या मूल्यांनुसारच आम्ही काम करत आहोत आणि पुढेही करत राहू.”
कार्यक्रमास नामदेवराव दुधाळ, नाळवंडीचे सरपंच ॲड. राजेंद्र राऊत, बीड जिल्हा उपप्रमुख संजय काळे, पाटोदा तालुकाप्रमुख गणेश मोहळकर, सुलतानपूर चे सरपंच धनेश्वर खेत्रे ,महादेव दुधाळ, रमेशराव दुधाळ, मोहनराव गोरे, सतीश मोहोळकर, सुरेश राऊत, आकाश मोहळकर , सुधीर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक लक्ष्मण गुंजाळ यांनी केले व आभार प्रदर्शन महात्मा फुले युवा दल बीड जिल्हा उपप्रमुख संजय काळे यांनी केले. यावेळी आनंदग्रामचे विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

