दिवसभरातील ठळक घडामोडी
???? ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्ताने राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
???? करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विकसित करण्यात येत असलेल्या तीन लसी वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात आहेत. त्यापैकी दोन भारतीय लसींच्या उमेदवारांवरील चाचण्यांचा पहिला टप्पाही पूर्ण झाला आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.
???? सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. येत्या एकवीस तारखेला म्हणजे 21 सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंद आणि आंदोलनाची हाक दिली आहे.
???? बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 30 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात निकाल देणार आहे.
???? रशियात झालेली कोरोनावरील लस स्पुटनिक-व्ही लवकरच भारताला मिळणार आहे. भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला लसीचे १० कोटी डोस विकण्याची तयारी रशियन सोव्हेरजियन वेल्थ फंडनं दर्शवली आहे. स्पुटनिक-व्ही लस परदेशी पाठवण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे.
???? थायलंडमधील माकडांनी अशी भीती निर्माण केली आहे की तेथील सरकारला एक विचित्र निर्णय घ्यावा लागला. सरकारच्या आदेशानंतर वन्य प्राण्यांवर कारवाई करणार्या विभागाने 200 हून अधिक माकडांचा प्रायवेट पार्ट कापले आहेत.
???? नागपुरात आधी 1000 खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. गेल्या 19 ऑगस्टला महानगरपालिकेने कोव्हिड रुग्णालयाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. पण, अद्यापही त्यावर काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत एका आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
???? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मजुंरी मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला आहे. राज्यातील तत्कालीन शिवसेना -भाजपच्या सरकारच्या कार्यकाळातील ही योजना आहे. तब्बल चार वर्षांनी अखेर या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
???? महाराष्ट्र : 2020-21 बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. कला, वाणिज्य शाखेसाठी ८०/२० तर विज्ञान शाखेसाठी ७०/३० पॅटर्न कायम ठेवला आहे. परंतु, तोंडी परीक्षाऐवजी आता ‘अॅक्टिव्हिटी शीट’च्या माध्यमातून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जातील.
???? राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीतून जवळपास ४५ भाविकांना घेऊन निघालेली बोट आज(बुधवार) सकाळी उलटल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अद्यापपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तीन भाविकांचे मृतदेह हाती लागले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
???? राज्यामध्ये १००० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. कोविड सेंटरला ५०० मेट्रिक टन आणि नॉन कोविड सेंटरला ३०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन लागतो. राज्याची एकूण ऑक्सिजन मागणी ८०० मेट्रिक टन इतकीच असल्याने आपल्याकडे २०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन राहतो. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही.
——————————————–
केज येथे उद्या मराठा आरक्षण प्रश्नी धरणे आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली स्थगिती उठवून तात्काळ अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी सकल मराठा बांधवांच्या वतीने केज येथील तहसिल कार्यालयासमोर १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेली स्थगिती उठविण्यात यावी, राज्य सरकारने मराठा आरक्षणसंदर्भात तात्काळ अधिवेशन बोलवावे, मराठा आरक्षण संदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या वाट्याला येणाऱ्या जागा रिक्त ठेवाव्यात या मागणीसाठी तहसिल कार्यालयासमोर १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन राहुल खोडसे, पद्माकर सावंत, गणेश थोरात, शेखर थोरात, गजानन गायकवाड, ऋषिकेश गलांडे, शिवाजी ठोंबरे, जी. सी. सपाटे, अजय थोरात यांनी तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्याकडे बुधवारी सादर केले.
——————————————–
पदाचा गैरवापर करीत उपसरपंचाकडून स्वस्त धान्य दुकान लाटण्याचा प्रयत्न
( चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी )
केज तालुक्यातील सोनेसांगवी क्र. २ येथील उपसरपंचाने पदाचा गैरवापर करीत सरपंच, तलाठी, ग्रामसेवकाला हाताशी धरून स्वतः सचिव असलेल्या शेतकरी बचत गटाकडे स्वस्त धान्य दुकान मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. तो प्रस्ताव रद्द करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुरेश उत्तम राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सोनेसांगवी क्र. २ येथील उपरपंच विजय अभिमन्यु जाधव यांनी गावातील स्वस्त धान्य दुकान इतरांना चालविण्यासाठी मिळू नये यासाठी त्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक अथवा त्रैमासिक बैठकीत मांडला नाही. शिवाय २६ जानेवारी २०२० रोजी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला नाही. या शिवाय सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना हाताशी धरून स्वस्त धान्य दुकानाचे जाहीर प्रगटन हे ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर डकविले नाही. तर प्रगटन प्रसिद्ध न करताच तलाठ्याने प्रगटनाचा पंचनामा ही माळेगाव या सज्जाच्या ठिकाणी करून पंचनाम्यावर उपसरपंचाच्या नातेवाईकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. मंडळ अधिकाऱ्यांच्या चौकशीत ही स्वतःच जवाब दिला. उपसरपंचाने स्वतः सचिव असलेल्या जय हनुमान शेतकरी बचत गटास स्वस्त धान्य मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार पाठविला आहे. तर प्रस्ताव आपल्या भावाच्या नावाने तयार करून पाठविला आहे. प्रस्तावासोबत जोडलेल्या २२ जानेवारी २०२० रोजीच्या ठरावावरून सरपंचाची बनावट स्वाक्षरी केली आहे. स्वस्त धान्य दुकान लाटण्यासाठी उपसरपंच विजय जाधव यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठ्याला हाताशी धरून पदाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे हे प्रस्ताव रद्द करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुरेश उत्तम राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.